Wednesday, November 29, 2023

पैल तोगे काऊ कोकताहे...

 सुप्रभात 🙏 🌹 ,


मनांत एकाचवेळी दोन विचार जागृत होतात. यालाच द्वैत म्हणत असावेत. जेव्हा मन , शरीर आणि अंतरात्मा यांचे एकाच दिशेने प्रवर्तन होते त्याला अद्वैत संबोधत असावेत. 

विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्राचे नांवच अत्यंत समर्पक " एक झाड दोन पक्षी " असं आहे. 

ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर रित्या द्वैत-अद्वैताची गोष्टी रुपाने मांडणी करतात. खालील ओवी पहा ...

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥


इथे त्यांनी ही एका पक्ष्याच्या , कावळ्याच्या कोकलण्यातून शुभशकून पाहिले . 

पंढरीनाथ घरी येणार हा तो शुभशकून !! तो महाराव घरी आल्यावर त्यांच्या मीलनांत सारे सारे द्वैत संपणार आहे. 

घर म्हणजे देह आणि कावळा म्हणजे मन . त्यांचे कोकलणे म्हणजे सतत मनात चाललेला घोषा . कोणाचा ? त्या माहेरच्या पंढरीनाथाचा. 

सारी रुपके फारच मनोभावे निवडली आहेत. आपल्यासमोर ठेवताना स्वतः च्या ही मनाला साद घालत आहेत. 

केवळ अप्रतिम !! अत्यंत तरल आणि माधुर्यपूर्ण. म्हणून म्हणतात ज्ञानेश्वरी ची एक तरी ओवी अनुभवावी. 

कृष्ण , ज्ञानेश्वर महाराजांना विट्ठल रुपात भेटला. तसा ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

No comments: