Tuesday, June 29, 2021

भगवंताचा वास अन् कृपादृष्टी

 आपल्या देवघराच्या खोलीमध्ये प्रवेश केला की विट्ठल रखुमाई च्या प्रसन्न मुर्त्या दिसतात . सोनचाफ्याचा छान सुगंध खोलीभर दरवळतोय दिवसभर . मन अतिशय आनंदमयी विश्वात रमून जातं. मनाचं डोलणं कसं असतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव. भरीस मंद आवाजातील शिवकुमार शर्मा यांचं पहाडी रागातलं संतूर वादन . धुंद करणारं स्वर्गीय वातावरण . आनंदविभोर करणारं . भगवंताचा वास अन् कृपादृष्टी अजून काय वर्णावी 🙏🏼🙏🏼🌹 

गेल्या दोन तीन दिवसांत श्रीधर स्वामींचं चरित्र वाचून झालंय. संतांच्या चरित्र वाचनाचा असा ही परिणाम साधला जातो . 🙏🏼

Thursday, June 24, 2021

तो काळच वेगळा होता

 तो काळच वेगळा होता. मला यावरुन आठवतं....

नागपूरला आजी किराणा आला की थोडा थोडा स्वतः घ्या कपाटात लॉक करुन ठेवत असे. महिना संपताच संपता किंवा पाहूणे आले की तिच्याकडचा हा कपाटात साठवलेला खजिना उघडला जायचा . 

मी एकदा विचारलं होतं असं का करतेस आजी ? नंतर ही तो संपणारच आहे . 

तेव्हा ती म्हणाली अरे घरच्या धबडग्यात काहीच शिल्लक राहणार नाही. मग कोणी घरी आले , कधी जावई लेक , पै पाहूणे आले की फजिता होऊ नये म्हणून ठेवावं लागतं बाबा . 

गेले ते दिवस . आता कोणी साठवून , अलग ठेवायच्या भानगडीत पडत नाही. 

पण तो काळ वेगळा होता. 

धान्य सुध्दा वर्षभराचे कोठ्यांमधून साठवले जात असे. आज कोठ्या ठेवायला ही जागा नाही. मुंबई मधे तर धान्य २ महिन्याच्या वर टिकत नाही. लगेच बुरशी लागते. इतकी हवा खराब झाली आहे. 

पूर्वी सारखं १०/१० किलोच्या चिनी मातीच्या बरण्या भरुन लोणचं ही कोणी घालत नाही. हेल्थ कॉन्शस असण्याच्या नावाखाली लोणचं खात नाहीत. नवीन जनरेशन ला काय माहिती लोणचं तेल मीठ कांदा घालून घट्ट वरण पोळी गाण्यातली मजा. दुपारचं खाणं सुध्दा मस्तपैकी पोळीला बचकाभर लोणचं वरुन तेल आणि पुंगळी करुन खाण्यातला आनंद. 

तेल मीठ कांदा लोणचं घालून कच्चे पोहे ह्याची चव रेंगाळते अजून . 

गेले ते दिवस चुलीवरल्या निखा-यावरच्या गरम पोळ्या खायचे. पोळी भाजल्याचा असा सुगंध नाकात शिरायचा की पोटात कावळे ओरडायला लागायचे. 

आंबा माचवून खायचा हे मुंबईतल्या पिढीला माहितीच नाही. त्या काळी एक अमृताघुटी नावाचा अगदी छोट्या चणीचा अतिशय मधुर चवीचा आंबा मिळत असे. गेल्या कित्येक वर्षात तो पहायला मिळालेला नाही.

दssssही असा मोठा आवाज देत एक बुढी मडक्यातून दही घेऊन येत असे . चंदी च लावली होती. दही थोडं पातळसर असे पण अगदी ताजं त्या दह्याचा सुवास ती आली की दरवळत असे. मग कधी जास्तीचं दही मागवून पांढ-या फेक धोतराच्या फडक्यात बांधून त्याचं घरी श्रीखंड बनवल्या जात असे . आजतागायत ती चव मुंबई मधे कुठे मिळाली नाही.

Saturday, June 19, 2021

बापाची आठवण

 किती ही झालं तरी

बाप हा बाप असतो 

पोटच्या पोरांसाठी 

तो माय ही असतो

डोईवरचं केवळ 

छत नाही 

तो आभाळमाया धरतो  

हातामधली ताकद 

सा-या कुटुंबासाठी राबते 

मन त्याचे 

मुलांभोवती फिरते

लेक त्याची 

जीव की प्राण 

पुत्राच्या भविष्याचे 

सदैव ठेवितो भान 

आशा , आकांक्षा , 

जिद्द , आत्मविश्वास 

सगळे मुलांसाठी 

कळि काळास 

अंगावर झेली 

तेही मुलांसाठीच  

कुटुंब त्याचे विश्व अन् 

घरदार त्याची सृष्टी  

मुलांच्या चेह-यावरील 

आनंद ही त्यांची कमाई 

मणभर मांस शरीरी झिलई  

मजबूत खांदे , रुंद छाती

मुठभर आठवणी

क्षणभर विसावा 

मन ओढ घेई 

पुन्हा बाप दिसावा 

अनिरुद्ध कवीश्वर-

🙏🏼🙏🏼🌹