सुप्रभात 🙏🌹
मानवी मन हे किती स्वैर विचार करु शकते आणि स्वतः चं असं स्वतंत्र विश्व तयार करु शकते हे जाणवतं.
वि द घाटे यांचं छोट्या छोट्या कथांचं एक सुंदर पुस्तक आहे. इंटर ला असताना आम्हाला अभ्यासाला होतं. त्यात एक फुलवेड्या माईंची कथा येते. मला नेहमी त्या फुलवेड्या माईंची कथा आठवते.
तुमच्या मालकीची एक सुंदर बंगली असावी . मोठ्ठं आवार , शेणाने सडा घातलेलं अंगण असावं . त्यात फाटकाच्या. कमानीवर चमेलीचा वेल चढवलेला असावा. घरात शिरण्यासाठी छान छोटीशी शहाबादी फरसबंदी ज्याच्या आजूबाजूला मऊ गवत डोकावूं पाहतंय अशी पायवाट .
अंगणाला बांबूच्या काठ्यांचे झाडांना मोकळीक आणि आधार देणारे कुंपण असावे. त्याच्या सभोवती जाई-जुई, मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का, बटमोगरा , अबोली , गोकर्ण , कृष्णकमळ , भरगच्च गुच्छ लगडलेला वेली गुलाब असावा , रंगीत लिली , चिनी गुलाब , बहरलेला केशरी जास्वंद अशा झाडांची रेलचेल असावी. कवठीचाफ्यासाठी स्वतंत्र कोपरा राखलेला हवा.
परसदारी पेरु , आंबा , सीताफळ, पपई ,शेवगा , अशी फळझाडे झाडांना आपले आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खत-पाण्यानी मशागत केलेली असावी.
पहाटे पक्षांची मंजूळ आवाजातली किलबिल , भारद्वाज पक्षाचे जोडीदारासह घुमणे, दुपारी चिमण्या आणि राघू यांचे थव्यांनी परसदारी दंगा करावा आणि संध्याकाळी कावळ्यांनी काव काव करत आंब्याच्या झाडावर वस्ती करावी.
पडवीमधला पितळी कड्या असलेला शिसवीचा वामकुक्षी साठी आमंत्रण देणारा झोपाळा आपलीच वाट पहात थांबलेला असावा.
अंगणातून नुकतीच खुडून आणलेली सुगंधी आणि रंगीत फुले वाहिलेली देवघरातील कृष्णाची एकच मनोहारी मुर्ती प्रेमभराने पहाताना मन प्रसन्न व्हावे . तुपाच्या मंद ज्योतीनी उजळून गेलेला देव्हारा , धूपाचा गंध , पूजेस्तव घंटीच्या नादाने वातावरण भारुन जावे.
वासना आणि भावनांचा कल्लोळ रिचवणारं , एकांतवासात ही आनंद देणारं , आल्या गेल्याची आपुलकीनं वास्तपुस्त करणारं , समाधाना नी मन शांत करणारं , तृप्त करणारं , जीवन समृध्द करणारं असं तुमचं घर असावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना. 🙏🌹
अनिरुध्द कवीश्वर -