Sunday, December 8, 2019

गुरुकृपा

स्फुट ९

निसर्ग स्वभावतः च सर्व गोष्टी बैलन्स करत असतो. आपण कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करो की अनावधानानी आपल्याकडून घडो , निसर्ग आपले काम चोख करतो. सर्वात महत्वाची बाब  की घटना घडत रहातात . आपण आपल्याला आलेल्या अनुभवानुसार ठरवतो चांगली की वाईट. पण निसर्गाच्या दृष्टीनी ती फक्त एक सामान्य घटना असते. कर्मबंधनं आपण सोडू म्हंटल्यानी सुटत नाहीत की संपत नाहीत. इंद्रिये अतिशय प्रभावशाली असतात. इंद्रियगोचर अनुभव मनावर परिणाम घडवतात आणि मन सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे.  जीवनांत तीन तत्वे सत्व रज तम कार्य घडवून आणतात.  नवरस त्यात भावना ओततात. ज्या तत्वाचे प्रमाण जास्त तशा भावना आणि अनुभव प्रत्ययास येतात.  आपण ज्यावेळी साक्षित्वानी पहाण्यास , रहाण्यास सुरुवात करु त्यावेळी दृष्टी सम्यक होते. सदगुरुंना शरण गेल्यानी ,  देह आणि मनाशी संलग्न त्रिविध तापांचे नकळत निराकरण होत रहाते . निर्लेप वृत्ती रुजणे गुरुकृपेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून सदगुरु दत्तत्रेयाय , नवनाथाय शरणं मम।

Wednesday, November 6, 2019

माहेरच्या मातीला ही सुगंध असतो

माझ्या सर्व सख्ख्या आणि चुलत बहिणी म्हणजे अलकाच्या नणंदा आणि सर्व जावा अशा सगळ्या स्त्रीपार्टी ला ४ दिवस माहेरपणाला अलकानी  हैद्राबादला बोलावलं होतं. ११जणी घरी आल्या होत्या.
Sharing few lines...
सहज , मनातलं ....

आज किलबिलाट आपापल्या घरी निघाला त्यांना पाठवलेला मेसेज.

" तुम्ही सगळ्या जणी आल्या एकत्र त्याचाच खूप आनंद. आपण सर्वजण जींवनात खूप कष्ट घेतो
 आपापल्या परीनी कुटुंबाच्या प्रगतिसाठी. काही बरेवाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. मुलांकडे लक्ष देता देता आपल्याला स्वतःच्या आवडी निवडींकडे पहायला वेळच मिळत नाही. मुलांच्या प्रगतिमधे , त्यांच्या सर्वांगीण विकासामधे आपलं समाधान असतं. मुलं आपापल्या पायावर समर्थपणे उभी राहिली की घेतलेल्या कष्टांचं सार्थक वाटतं. जींवनातल्या बर्या वाईट प्रसंगांमधून आपलं धैर्य आणि धीर दोन्हींची कसोटी लागते.
अधून मधून आपल्याला सुध्दा रिफ्रेश व्हावंसं वाटत असतं पण रोजच्या धबडग्यामधे आपण हे मिस् करत रहातो. यावेळी तुम्ही सर्वजण येऊन मनमोकळेपणानी रहावं यासाठीच बोलावलं होतं. शिल्पा सोडली तर आपण सर्वजण आयुष्याच्या सेकंड फेजमधे आहोत. आपण आपल्यातला उत्साह आपल्या स्वतःसाठी आणि मुलांसाठी पण जागृत ठेवायला हवा. परस्पर स्नेहभाव हाच खरा ठेवा आहे. तो आपण सर्वांनी जपला आहेच तो नव्या पीढीमधेही आपोआप ट्रान्सफर होतो आहे. ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.
झाडून सर्वजणी आलांत , खूप छान छान आठवणी तुम्ही मनांत घेऊन जावं अशी माझी आणि अलकाची दोघांचीही ईच्छा होती. I hope all of you enjoyed the stay.
माहेरच्या मातीला ही सुगंध असतो , नात्यांमधे गोडवा असतो तसा तो सासरी आलेल्या मुलींनाही वाटला पाहिजे म्हणून तुम्हा सर्वजणींना एकत्रच बोलावलं. खूष रहा , आनंद घेत रहा , आनंद वाटत रहा. "
अनिरुध्द कवीश्वर

Friday, October 11, 2019

स्वैर १२ १० २०१९

प्रत्येक वयातल्या समजूतीनुसार मनुष्य वागतो. त्यात बरोबर चुकीचं असं काहीच नाही. वाचन , मनन आणि मैच्युअर लोकांची संगत यामुळे विचारांमधे बदल घडत जातात. मन , विचार अधिक समृध्द होत जातात. देहातीत विचारांनी आत्मनाआत्मविवेक जागृत होतो. तिथे खरं इवॉल्मेंट ला सुरुवात होते. या स्थितीमधे मन कधी देहाशी निगडीत स्वार्थाशी संबंधीत विचार करतं तर कधी देहातीत होऊन आत्ममग्न स्थितीमधे रहातं. दोन्ही अवस्थांमधे मन कधी इकडे कधी तिकडे असं फिरत रहातं . नामस्मरणानी मन रितं होत रहातं. हळुहळु त्याची गोडी लागते . अशा वेळी मनाला ओढ लागते ती शांत , निमग्न अवस्थेची. आता आपल्याला खरे सुख कशांत आहे ते कळू लागते. पण परमेश्वराची लीला तो कधी समजू देत नाही.  मन फसवते . सतत वेगवेगळ्या पध्दतीनी असं भासवते की बस्स आता सर्व ज्ञात झाले . आता कैवल्यानंद कारण त्याची छोटीशी झलक नामस्मरणानी मिळालेली असते. काही छोट्या सिध्दी प्राप्त होतात.  अशावेळी तावडीत सापडलेल्या उंदराला मांजर जशी खेळवून खेळवून दमवते तशी माया जीवाला इंद्रियगोचर सुखाची लालूच दाखवत खेळवत रहाते. त्यात मन मोठीच भूमिका निभवते. वस्तूस्थितीचं यथास्थित ज्ञान झाल्यावरच सत्याची प्रतिष्ठापना होते. तोपर्यंत त्रिशंकू अवस्थेत जीव अधांतरी असतो.

Monday, October 7, 2019

जीवन

स्वैर

 रजः तम आणि नऊ रस , पंचमहाभूतं मन , बुद्धि , अहंकार यांचा कल्लोळ म्हणजे जीवन. मोह होणं नैसर्गिक आहे. तो जीवनेच्छांचा ओघ आहे. शरीरभोग हा इंद्रियांचा जीवनरस आहे. मन अमर्याद सत्ता इंद्रियांवर राखून आहे. सृष्टीची रचना आणि संकल्प समजल्याशिवाय कोणताही दमनाचा प्रयोग फोल ठरतो. सर्व षड्रिपू जीवनांत स्वाभाविक आणि सहज आहेत. त्या एक प्रकारच्या शक्तिच आहेत. त्यांचा आपल्या जीवनांत कसा उपयोग करायचा याची कला म्हणजे जीवन जगण्याची कला.