आपण देवदर्शनाला जातो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहून अनंत विचार आपल्या मनामध्ये येतात. कधी भिक मागणे अस्वस्थ करते , कधी अस्वच्छता , कधी दर्शनासाठी ची ढकला ढकली , कधी पैशाचा चाललेला दुरुपयोग तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करणार्या दर्शनार्थीं ना पाहून नेमके हे देवदर्शनासाठी आले की कशासाठी हा प्रश्न उभा रहातो.
प्रासंगिक आणि सांसारिक प्रश्नांचा भुंगा मनाला पोखरत असताना भगवंताची स्मृति बाजूलाच रहाते.
दर्शनासाठी रांगेत उभे असताना मनांत असंख्य विचारांची गर्दी होते. भगवंताच्या विग्रहाचे आपण दर्शन घेतो म्हणजे खरोखर
" डोळ्यानी पाहीन रुप तुझे .." असे होते का?
मनोमन आपण त्या ईशतत्वापाशी एकरुप होतो की जीवनामधल्या समस्यांच्या उत्तरांची अपेक्षा करत असतो ? हा देव मला चिंतामुक्त करील अशी आशा करतो ? बरं तो तसा ठामपणे विश्वास ठेवण्याची आपल्या मनाची तयारी असते का ? की सोयीनुसार आपण ठरवतो ? आपलं काम झालं तर हा देव खरा नाही तर दगड ?
मन हे सहावं इंद्रिय असलं तरी पंचमहाभूतांनी तयार झालेल्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये या दश इंद्रियांवर मनाचे वर्चस्व असते. सदसद्विवेकबुद्धी नी निर्णय दिल्यावर ही देहाधिष्ठीत जीवा ला फरफटत ओढून नेण्याची शक्ती मनामधे असते.
आपल्या विचारांशी आपलाच झगडा सुरू असतो त्याचाच उल्लेख करताना तुकाराम महाराज म्हणतात " रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ". आशा निराशेच्या खेळात त्रयस्थपणे , साक्षीभावाने प्रत्येक गोष्ट अनुभवणे म्हणजे अंतर्मनाच्या शुध्दिकरणाची प्रक्रिया.
खरं म्हणजे तीर्थस्थळी देवदर्शनापेक्षा या अशा आत्मदर्शनाची संकल्पना मला जास्त संयुक्तिक वाटते.
अनिरुद्ध कवीश्वर -