*एकोहं बहुस्याम्*
स़ंतशिरोमणि ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेखिलेली
" विश्वविकसित मुद्रा " ही एकोहं बहुस्याम् ची परिणिती आहे.
" यदन्तस् तद् बहि: | "
जे आंत आहे तेच बाहेर आहे
" पिंडी ते ब्रह्मांडी "
जे देह रुपात आहे ते ब्रह्मांडाचेच रुप आहे.
यत्र स्थितमिदं सर्व कार्य |
यस्माच्च निर्गतम् |
तस्यानावृत्तरुपत्वान्न निरोधोsस्ति|
कुत्रचित् ||२|| स्पंदकारिका
स्पंदशक्तिमय संविद् अशा शिवाच्या स्फुरण मात्र संकल्पाने प्रवाहमान असणार्या स्पंदनांचे सृष्टी रुपाने प्रसरण होते. त्या शिवशक्तिला कोणतेही आवरण झांकू शकत नाही तसेच त्यांचे प्रसरण ही रोखू शकत नाही.
या शिवशक्ती चे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज समजावतात-
ज्या एका सत्तेचे बैसणे |
दोघा एका प्रकाशाचे लेणे |
जे अनादी एकपणे |
नांदती दोघे ||८|| अमृतानुभव प्र-१
जया ( प्रकृति - पुरुष ) एका ब्रह्माच्याच चित्प्रकाशाने प्रकाशली गेली आहेत. अनादी कालापासून एका अधिष्ठान ब्रम्हचैतन्याहून वेगळी नाहीत असे हे निखळ ब्रह्मच जगत् रूपाने विकसित झाले आहे.
प्रकृती-पुरुषा मध्ये सृष्टीच्या दृश्यमानतेमुळे द्वैत्व भासमान होत असले तरी त्यामध्ये अभेदत्त्व आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे अद्वैताच्या सिद्धांताकडे आपले लक्ष वेधतात.
ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अतिशय मधुर आहे. सर्वसामान्यांना समजू शकेल अशा सोप्या भाषेमध्ये अनेक उदाहरणे देऊन ते उलगडून सांगतात.
कैसा मेळू आला गोडीये |
दोघे न माती जगीं इये |
की परमाणुहि माजी उवावे |
मांडिली आहाती || ११|| अमृतानुभव प्रकरण १
प्रकृति पुरुषाच्या मेळा संबंधी वर्णन करताना महाराज म्हणतात की त्यायोगे
प्रकृति- पुरुष एवढी वाढली , प्रसरण पावली की जगतात मावेनाशी झाली . तथापि अतिसूक्ष्म अशा परमाणु मध्येही ती दोघे नांदत आहेत.
हेच संत तुकाराम महाराज वेगळ्या शब्दांमध्ये वर्णन करतात.
"अणूरेणिया थोकडा तुका झाला आकाशाएवढा"
अणुरेणूं पेक्षाही सूक्ष्मतर वस्तुमानापासून आकाशापेक्षाही मोठ्या वस्तुमात्रां पर्यंत मी व्याप्त आहे.
वर्तमानावभासानां भावनाभवभासनम् |
अंत:स्थितवतामेव घटते बहिरात्मना || १.५.१ ई प्र वि
( ईश्वर- प्रत्यग्भिज्ञा - विमर्शिनी )
बाह्यरुपात अवभासित वस्तुमात्र भिन्न सत्ता नसून आंतरिक चैतन्य सत्तेचाच बाह्य प्रसार आहे. एकातून अनेकत्व प्रसरण पावते तरी त्या प्रत्येकात एकत्व अंतर्निहित आहे .
तैतरियोपनिषदातील याचे वर्णन
" रसो वै स: " असे केले आहे.
चित्-रसात्मक तरलता स्वतःच आपल्या स्वातंत्र्य वृत्तीने स्फुरण पावून भावनात्मक घनता स्वीकारते . घनता जितकी दृढ होत जाते तितकी जडता प्राप्त होते . घनीभवनाची अंतिम सीमा पृथ्वीतत्व आहे.
भारतीय तत्त्वज्ञान सृष्टीच्या निर्मितीच्या तत्त्वांचा शोध घेते त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सज्ञांचा उपयोग होतो . या स्पंदशक्ती शास्त्राची आधुनिक विज्ञानाच्या क्वांटम फिजिक्स , क्वांटम मेकानिक्स या शाखेशी जोडलेली नाळ आपल्या लक्षात येईल . फक्त तत्कालीन संस्कृत किंवा प्राकृत भाषांमधील टर्मिनोलॉजी वेगळी आहे ते सहाजिकच आहे.
Quantum physics is the study of matter and energy at the most fundamental level. It aims to uncover the properties and behaviour of the very building blocks of nature.
सूक्ष्मातिसूक्ष्म मूलकणांच्या प्रचलनाचा व त्याच्या प्रतिक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा पुंज विज्ञानाचा गाभा आहे.
याच तत्त्वाचा अभ्यास शिवसूत्रामध्ये , ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव मध्ये केलेला आहे. याच विषयावरील स्पंदकारिका हा ग्रंथ आठव्या शतकात भट्टकलट याने लिहिला आहे . गुरु वसुगुप्ताच्या शिकवणीतील श्लोकांचे ते संकलन आहे .
काश्मिरी विद्वान आचार्यांची परंपरा अक्षुण्ण आहे. परकीय आक्रमणाने ती खंडित झालेली नाही या काश्मिरी शैविझम् या ज्ञान परंपरेतील आधुनिक काळातील गुरु ' लक्ष्मण जु ' होत . स्पंदकारिका ग्रंथांचे हिंदी भाषांतर करणार्या आचार्य नीलकंठ गुर्टु या विद्वान कश्मीरी पंडित लेखकाचा मृत्यू दिल्लीमध्ये अलीकडच्या काळात म्हणजे डिसेंबर 2008 मध्ये झाला.
काश्मीर ते थेट महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराजांच्या नेवासे इथपर्यंत झालेला शिवसूत्रांचा प्रवास अभ्यासण्या जोगा आहे. अतिशय समृद्ध असे तत्वज्ञान आणि तितकीच प्रवाहमान असलेली ज्ञानाची परंपरा भारताचे वैभव आहे.
शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
हे विश्व रूपाचे सोहळे |
भोगूनी निवले जी डोळे |
होताति आंधले |
कृष्णमूर्तीलागी || (११.६०६ ) ज्ञानेश्वरी
हे श्रीकृष्ण परमात्मा तुझे जगत् रुपातील प्रगट सोहळे पाहून , भोग - उपभोग घेऊन डोळे निवले . आता अंतर्मनातील कृष्णरूपा व्यतिरिक्त कशाची आस राहिली नाही .
असा हा सृष्टीद्वारे भोग आणि योग अनुभवास आणणारा , शेवटी सर्व स्वतः मध्ये विलीन करुन घेणारा सखा , ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा अन् ओळखता ही यावा.
अनिरुध्द कवीश्वर -