Monday, October 19, 2020

मुक्ती

                    आयुष्य म्हणता म्हणता उडून जाईल . अहंकार आणि स्वाभिमान यातली रेघ अतिशय पुसट आहे. भावनेच्या भरात आपण नकळत अहंकार तर जोपासत नाही ना ? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारुन पहावा. कोणी कोणाचे नसते असं जरी असलं तरी आपण स्वीकारलेली नाती तर खरीच असतात नं. स्वतःला मुक्त करण्याच्या नादात आपण कोषात तर जात नाही ना याचा विचार करणे गरजेचे आहे. आयुष्य क्षणभंगूर असलं तरी भावनांनी खुलवता येऊ शकतं फक्त डोळसपणे नात्यांकडे , व्यक्तिंकडे पहाता यायला हवं. 👍🏼

                  वास्तविक पहाता आपल्याला जे दृष्टोत्पत्तीस येतं ते आपलंच स्वरुप असतं. आपण सर्वांमधे स्वत:ला अवलोकित करत असतो. पुष्कळवेळा आपलेच गुणदोष जाणवतात. 

         आत्मचिंतनासाठी वेळेची मर्यादा नाही. कारण काळ विचारसापेक्ष आहे. 

 🙏🏼

Thursday, October 15, 2020

विट्ठल उभा विटेवरी

                     मला खूप वेळा प्रश्न पडतात आणि मी त्यावर मनन करीत रहातो. पण आपला विचार , आपली समजूत बरोबर आहे का ? हे जाणून घ्यायची मनोमन इच्छा असते.    

           काही काही वेळेला प्रश्न पडतात की शब्दांची उत्पत्ती अशीच होत नाही त्यामागे काही विशेष बाब असू शकते. अमुक एक नाम  असण्यामधे सुध्दा काही अर्थ असावा . 

            वारकरी म्हणतात तसा "विटेवरी ठेला" हा मला भक्त पुंडलिकाच्या कथे संदर्भात सहज सोपा वाटतो. 

               आता ही विट कुठली ? सामान्यपणे ही माती भाजून केली वीट जी पुंडलीकाने आई-वडिलांच्या सेवेत असल्याकारणाने भगवंताला वाट पाहीस्तोवर उभं रहाण्या साठी म्हणून दिली. जी कथा सर्वमान्य आहे. 

             मला असं वाटतं की भगवंत असे सूचवू पहात आहेत की या प्रपंचातले सर्व दु:खभोग भोगून झाले , इंद्रियसुखे उपभोगून झाली  दोन्ही सम समा झाले आता या सर्व गोष्टींचा वीट आला आहे अशी तुझी अवस्था होईल तेव्हा त्या विटेवरी मी सहजस्थितीत उभा ( ठेला ) आहे . ही सहजस्थिती संतांना प्राप्त झालेली असते.

            ‌ ‌ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ।।४८।। ‌ 

अर्थ-ः ते संत दांभिक वैराग्याने भोगाला विटत नाहीत, आणि क्षणिक वैतागाने त्याग करण्यास उठत नाहीत तर, ते स्वतः आपल्या सहजस्थितीत सर्वकाळ राहतात. ||४८||

एकनाथी भागवत -

                 

Saturday, July 11, 2020

मन मोगरा फुलला

मोगरा फुलला , मनमोगरा फुलला



मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला

अध्यात्मामधे घाई करुन चालत नाही. तिथे फक्त लागतो मनाचा निर्मळ पणा आणि स्वत:चा स्वत:शी असलेला प्रामाणिकपणा. 
अगदी मनापासून अभ्यास करण्याजोग्या गोष्टी आहेत. दिशा दाखवणारं कोणी हवं. पुढचा प्रवास प्रत्येकाला आपापल्या अनुभवा नुसार करायचा असतो. सर्वजण एकाच ठिकाणी पोहोचतात . कोणी आधी कोणी उशीरा.         कोणाला काही दाखवायचं नाही आहे. आपलीच परिक्षा , आपलीच प्रश्नपत्रिका , उत्तरं ही आपलीच आणि परिक्षक ही आपणच. इथे मार्कांची चढाओढ नाही. किंबहूना आंतरिक वृत्तींमधला उचित बदल आणि समाधान हेच लक्ष्य. 
               श्रीकृष्ण मला फार आवडतो. जन्मच कोठडीतला पण त्यातून ही मुक्त झाला.  आयुष्यातल्या त्या त्या पर्वामधे जे भोग भोगायचे , उपभोगायचे ते सर्व श्रीकृष्णानी केले. रणांगणातून पळाला रणछोडदास नांव ही मिरवलं . प्रेयसी रुक्मिणीला पळवून नेले अन् विवाह रचिला. स्वत:च्या दोन स्त्रिया असून ही जरासंधाच्या विधवांना वरले आणि स्वीकारुन सामाजिक प्रतिष्ठा दिली. 
             युध्द टाळण्याचा प्रयत्न म्हणून प्रसंगी कर्णासंबंधी गुह्य देखिल उघड केले. युध्द सुरु झाल्यावर अवघड प्रसंगी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही हे दिलेले वचन ही मोडीत काढले . स्वत: राजा असूनही अर्जूनासाठी सारथी झाला. कोणती भूमिका सार्थ नाही केली ? सर्वकाही केले , पणाला लावले . 
              श्रीकृष्णाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे गलितगात्र अर्जूनाला कर्म करण्यास प्रवृत्त होण्यासाठी उपनिषदांचे सार सांगीतले. गीतेमध्ये भगवंतांनी पार्थ असा शब्द वापरला आहे . पार्थ म्हणजे पृथ्वीचा पुत्र/पुत्री. या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक व्यक्तिसाठी मार्गदर्शक तत्वे सांगीतली. 
             अर्जूनाला विश्वरुप दर्शन देताना तो छातीठोकपणे सांगतो या सृष्टीचा निर्माता , चालक आणि ध्वंस कर्ता मीच आहे. सर्व माझ्यातूनच उत्पन्न होतात आणि माझ्यातच विलीन होतात.   तो म्हणतो माझी सृष्टी  दृष्य आणि अदृष्य म्हणजे अस्तित्वात असून डोळ्यांना न दिसणारी ही  आठ प्रकारांनी विभागलेली आहे. पंचमहाभूते ही दृष्य तर मन , बुध्दि आणि अहंकार ही डोळ्यांना न दिसणारी म्हणून अदृष्य संबोधिलेली.
             यांचा क्रम सांगताना ही उचित स्वरुपांत सांगीतला आहे. आपण क्रम पाहिला तर लक्षांत येईल प्रत्येक तत्व हे चढत्या क्रमानी व्याप्ती वाढवत जाते. पहिलं तत्व पृथ्वी , शब्दश: न घेता पृथ्वी म्हणजे सर्व जड पदार्थ जे सर्वात कमी जागा व्यापतात. त्यानंतर आप म्हणजे केवळ पाणी न समजता सर्व द्रवपदार्थ हे जडापेक्षा अधिक जागा व्यापतात . त्याला तेज म्हणजे उष्णता मिळाली की वायू तयार होतो हे चवथे तत्व अधिक जागा व्यापते . आकाश हे पुढचे तत्व म्हणजे  अतिविरळ स्वरुपात असलेला वायूचा संचार . हे आकाश तत्व सर्वाधिक जागा व्याप्त करते . यानंतर सहावा क्रमांक हा मनाचा लागतो. म्हणून म्हंटलंय
 'मन: षष्ठाणी इंद्रियाणी' !! 
Sixth sense ...
मन हे तत्त्व आकाशापेक्षा अधिक जागा व्यापते  त्याचा परिणाम ही खूप मोठ्या प्रमाणावर होतो.  कोणाचं मन दुखवू नये असं म्हंटलं जातं ते याचकरितां कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. 
              मना नंतर क्रमांक लागतो तो बुध्दिचा . मन चंद्रावरील डागावर  कविकल्पना करते पण बुध्दि त्याचे कारण सांगते. विश्लेषक बुद्धीच्या कार्याची व्याप्ती मनापेक्षाही अधिक असते. सर्वात शेवटचं आठवं तत्व म्हणजे अहंकार . 
       या अहंकाराला इथे गर्व या अर्थानी न घेता भगवंतापासून मी अलग आहे ही भावना जागृत करणारे तत्व असा घ्यावा. या तत्वाच्या प्रभावाखाली 'मी' येतो अन् माझेच स्वतंत्र विश्व निर्मितो. मी आयुष्यभर आपल्याच विश्वात रहातो. 
          माऊली जेव्हा मोगरा फुलला चं विश्लेषण करुन सांगतात तो हा भगवंतानी सांगीतलेला ज्ञाना चा चढता वाढता मोगरा अन् त्याचा सुगंध . तो एकदा फुलला की त्याचा ही शेला गुंफून  बाप रखुमादेवीवरु विट्ठले अर्पावा. 

    "तेणे मुक्ति चारी साधीयेल्या" 
🙏🙏

अनिरुद्ध कवीश्वर-

Thursday, July 9, 2020

रेल्वे स्टेशनचे सौंदर्य





हे केरळ मधील मेल्लाटुर रेल्वे स्टेशन आहे. लॉकडाऊन मुळे ट्रेन्स चे ट्रॅकवरुन धावणे जवळपास बंदच आहे .  गुलमोहराच्या वृक्षानी आपल्या लालचुटुक फुलांनी रेल्वे स्टेशन आणि रेल्वे रुळांवर आपली माया बरसली आहे. जणू काही एखादे सुंदर रंगीत निसर्गचित्र रेखाटले आहे. 
      
त्या हिरव्या गर्द झाडांच्या पार्श्वभूमीवर शांत रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवर , ट्रॅकवर पसरलेल्या गुलमोहराच्या पाकळ्या एकदम अनोखे दृष्य . खरोखर निसर्ग आपलं सौंदर्य मनसोक्त लुटतो फक्त दृष्टी हवी.      
      
       इतक्या सुंदर या पाकळ्यावरुन चालण्याची कल्पनाच किती रोमहर्षक आहे. नवनूतन दांपत्याच्या स्वागतासाठी अंथरलेला छान मऊशार गालिचा पसरलाय असं वाटावं. 

        मला अशी शांत , आपल्याच संथ गतिमधे रहाणारी , फारसा आवाजाचा गोंधळ नसणारी , सुबक स्वच्छ रेल्वे स्टेशन खूप आकर्षित करतात. 

        अकोला ते खांडवा मीटर गेज रेल्वेचा प्रवास बहूतांशी जंगलातूनच आहे. इथली रेल्वे स्टेशन्स म्हणजे एखादा बसायला बेंच किंवा कट्टा , दोन तीन वृक्ष आणि थोडी सपाटी केलेली हिरवळ असलेली जमीन बस्स !! जंगलातल्या वृक्षांचा एक छान सुवास दरवळत असतो. 

    साऊथला मदुराई - रामेश्वरम्  च्या रुटवर उच्चीपुली स्टेशन असंच टुमदार , छोटंसंच स्टेशन आहे. प्लॅटफॉर्मवर छान जांभळाचे वृक्ष आहेत. अगदी स्वच्छ ठेवले आहे. एकदम शांत स्थळ . याच रुटवर पुढे सुप्रसिध्द पंबन ब्रिज आहे.
      
असेच सुंदर दृष्य कोकण रेल्वेच्या स्टेशन्सवर दिसतं. तिथे तर छाटे छोटे धबधबे , पिवळी सुरेख गवतफुले आणि हिरवे डोंगर असं अप्रतिम , डोळ्यांना सुखावणारं सर्व असतं.  केवळ ते अनुभवण्यासाठी तरी पाऊस संपता संपता कोकण रेल्वेनी प्रवास करावा .

अनिरुद्ध कवीश्वर-

Sunday, July 5, 2020

आकाश मोकळे करते

प्रतिमांमधे गुंतलो मी
मुळ स्वरुप समजेना
नाती गोती खूप जमली
सारा गोतावळा भोवताली
भावनांच्या कलकलाटात
विसरले आत्मभान ही
जेजे दिसले तेते सत्य
मनी भ्रम पोषित गेलो
मी , माझ्या भोव-यात
अजूनच फसत गेलो
जोपासले गंड वेगळाले
बुध्दीस टाकिलें गहाण
विसरलो नाद अनाहत अन्
गोंधळास जवळ केले
हेच आयुष्य खरे
मनास भुलवीत गेलो
घडत गेले संस्कार अन्
वाडा चिरेबंद करीत गेलो
किलकिल्या खिडकीतून
तिरीप प्रकाशाची येते
अधून मधून का होईना
आठवण तेजाची स्मरते
साठविले ते ते सारे
उध्वस्त करुन जाते
फोडूनी घडा विभ्रमांचा
आकाश मोकळे करते
आकाश मोकळे करते

अनिरुद्ध कवीश्वर-

आज कुणीतरी यावे

आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे

सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे


 ग. दि. माडगुळकर
आशा भोसले
सुधीर फडके
मुंबईचा जावई - 1970

          हे नुसतं गाणं नाही तर त्या शब्दांनाही वजन आहे , अर्थ आहे , भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य‌‌‌ आहे.

कुणीतरी यावे ते ही कसे तर वळवाच्या पावसासारखे अचानक ... 

श्वासांत भरुन  घ्यावा असा हलका मृदगंध घेऊन ...

विचारल्याविण हेतू कळावा असा तो स्नेह जुळावा .... 

काय variation आहे 👌👌

गाण्याला पार्श्वभूमी आहे ती कालिदासाच्या मेघदूताची आठवण करुन देणा-या घनभरल्या मेघांची . रिमझिम पडणा-या पावसाची . 

आशाताईंचा लडिवाळ आवाज आणि नायिकेनी चेह-यावर साकारलेली सहज आनंदाची लकेर ...

अशी काही गाणी मनांत घर करतात . ऐकता ऐकता वेगळ्या विश्वात घेऊन जातात. स्वप्नातल्या दुनियेत.

आपण या अत्यंत विद्वान कवींच्या सहजसुंदर गीतांचे साक्षीदार आहोत. मराठी मधे शिकलो , मराठी गीतांचा अर्थ समजू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. मनाच्या एक तरल अवस्थेची जाण या कवींच्या गाण्यांनी करुन दिली. आपण खरंच भाग्यवान आहोत.


अनिरुद्ध कवीश्वर-