Thursday, September 28, 2023

सर्जन-विसर्जन

 सुप्रभात 🙏,


पार्थिव मुर्ती वर इतका जीव जडतो अन् दहा दिवसांत देखण्या रुपाचा लळा लागतो. जे जे म्हणून सुंदर आणि उदात्त आहे त्याची आस मनांत रुजते. 

प्रत्येक सर्जनाचे विसर्जन होत असते हे माहित असूनसुध्दा मन कातर होते. बहिणाबाई उगाच म्हणत नाहीत.

" मन वढाय वढाय ... " 

क्षणभंगूर जीवनात देखिल आनंद भरुन जगता येतं अन् तितक्याच सहजतेनी देह सोडून चैतन्यात विलीन होता येतं अशी शिकवण देणारा तो सुखकर्ता - दु:खहर्ता आहे. 🙏🏻🙏🏻🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Tuesday, September 26, 2023

ऋतुचक्र

 सुप्रभात 🙏 🌹

सुदर्शनचक्र म्हणा , ऋतुचक्र म्हणा , रथचक्र म्हणा चक्र हे प्रगतिचे आणि गतिचे द्योतक मानले गेले आहे. 

चंद्र स्वतः भोवती पृथ्वीभोवती , सूर्याभोवती , पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, सूर्य स्वतः  भोवती अन् ग्रहमंडळासह दूधगंगेच्या आसाभोवती चक्राकार फिरत आहे. 

हे  सर्व तारामंडल , ग्रहमंडल , उपग्रहमंडल आणि धूमकेतूंसह दूधगंगा  स्वतः भोवती चक्राकार फिरत आहे. 

दूधगंगेसह सर्व भोवर्यासारखे आवर्त घेऊन ऊर्ध्वगामी  गतिमय तसेच स्पंदनशील आहे . 

या सर्वाची मूल प्रेरणा शिवाची स्पंदशक्ती आहे. स्पंदने हा या स्पंदशक्तीचा परिणाम आहे. 

या स्पंदनामुळे जो नाद निर्माण होतो तो आद्य नाद म्हणजे ॐकार . शिवाच्या डमरु वादनातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या लयींमुळे ध्वनी अन् आकार ऋषिंच्या मनात उमटले ती अक्षरे. त्यातून शब्द , भाव , दृष्य दृगोच्चर झाले. म्हणून आपल्या सृष्टीला शब्दसृष्टी संबोधल्या गेले आहे. विचार शब्दांशिवाय प्रकट होत नाहीत. 


अनिरुद्ध कवीश्वर

रांगोळी एक ऊर्जा देणारी कला...

 रांगोळी एक ऊर्जा देणारी कला...

पहाटे पहाटे सडा टाकून दक्षिणेत अजून ही घरासमोर छान वैशिष्ट्य पूर्ण पारंपारिक रांगोळ्या काढल्या जातात. 

रांगोळी चा उगम मंडला पासून झाला. आकाशस्थ ग्रह तारे यांचेशी पूजा पध्दतीच्या आधारे संपर्क साधण्याचे  शास्त्र म्हणून मंडलांची निर्मिती झाली. 

पारंपारिक रांगोळ्या या त्या मंडलांचेच स्थूल स्वरुप आहे. सृष्टीच्या निर्मितीशी , वैश्विक उर्जेशी संबंध जोडणार्या  पारंपारिक रांगोळ्या शुभचिन्हे समजल्या जातात. 

सर्जनशीलतेला आवाहन करणार्या रांगोळ्या घर-अंगणाचा परिसर आणि मनाला प्रसन्न करणार्या असतात. 

मातीचे अंगण शेणानी सारवून त्यावर तांदळाची पिठी ओली करुन विविध आकाराची पारंपारिक रांगोळी काढली की त्यातील सौंदर्य मनाला आनंद देते. 

दिवसाची सुरुवातच मंगलाचरणानी आणि सुंदर रांगोळ्यांनी केली की दिवसभराची ऊर्जा प्राप्त होते.


अनिरुद्ध कवीश्वर -

Evolvement

 पतंजली योगशास्त्र...

पतंजली योगशास्त्र म्हणजे निरोगी जीवन जगण्याची कला आहे. शरीर आणि मन यांचा समन्वय कसा साधावा यांची सूत्रे सांगीतली आहेत. त्याला एक सिक्वेन्स आहे. 

यम - नियम साध्य केल्यावर आसन स्थिर होते. स्थिर सुखासनात प्राणायाम उत्तम साधतो . त्यात सातत्य असले की धारणा , म्हणजे मानसिक  प्रसन्नता राहण्यासाठी असलेल्या संकल्पना पक्क्या होतात. आसन स्थिर झाले आणि धारणा रुजल्या की ध्यानावस्था लवकर साधते . ध्यानाची अनिर्वचनीय सूप्त शक्ती म्हणजे समाधि अवस्था. 

अध्यात्मामधे शॉर्टकट नाहीत. मन निर्मळ होणे , स्वतः शी प्रामाणिक असणे महत्वाचे . 

सद्गुरूंना , कुलदेवतेला , आराध्य देवतेला नम्रपणे विनंती करुन सहाय्य मागणे यात कुठलाही कमीपणा नाही. आपल्या मनातील तगमग , शंका-कुशंकांचे आपोआप निरसन होत रहाते. 

जन्म हा एकप्रकारचा मृत्यु अन् मृत्यु हा एक प्रकारे नवा जन्म होय. घडते ते फक्त " स्थित्यंतर " . 

It's continuous process of evolvement from one state to another as well as one phase to another. It is happening every moment without any break.


अनिरुद्ध कवीश्वर -

संवाद मनाशी

 स्वतः शी स्वतः चा संवाद...

गुरुपाशी केवळ शारण्यभाव असावा हे आपल्या मनावर सतत बिंबवले गेले आहे. तसा गुरु  सापडणे आजच्या काळात दुर्मिळ, कठीण आहे पण अशक्य नाही. गुरु ला शोधण्याची गरज नाही. तेच तुम्हाला शोधतात. भारतात अव्याहतपणे सद्गुरू परंपरा चालत आली आहे जी विशिष्ट पातळीवर आत्मज्ञाना ची प्रत्यक्ष अनुभूती घडवणयास सहाय्यभूत ठरते . 

आपल्या महाराष्ट्राचे दैवत असलेला विट्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून आहे. देणे - घेणे असा व्यवहार नाही. 

आजच्या काळात पुस्तके हेच गुरु असे बर्याच लोकांना वाटते.  शिख धर्मामधे " गुरु ग्रंथ साहिब" या त्यांच्या धार्मिक ग्रंथालाच गुरु संबोधले आहे. यात संत नामदेवांच्या ही रचना आहेत. 

वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी , मन मोठे करण्यासाठी , माहिती मिळण्यासाठी पुस्तके साथ देतात . 

एका पुस्तकाचे नांवच खूप काही सांगून जाते. 

" पावलापुरता प्रकाश " 

आपण समजूती च्या , जाणिवांच्या ज्या स्तरावर असतो त्याच्या पुढे फक्त एका पाऊलपुरता प्रकाश पडतो. जो दिशेचे मार्गदर्शन करतो. 

आत्मभान आणणारे ज्ञान आपोआप अंतर्मनात प्रकाशते त्यावेळी मन निर्विकल्प एकतानता साधते. अन् निसर्गाशी एकरुप होणे सहजक्रिया होते.  

तुकाराम महाराज म्हणतात तसे -

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।

नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।

रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।

जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।

करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।

आपुला चि वाद आपणांसी ।।

-संत तुकाराम

हा आपल्या मनाशी होणारा संवाद फार महत्वाचा आहे.


मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ अमृतबिंदूउपनिषद ll२ll 


मन हेच मनुष्याला बंधनात टाकण्यास अथवा मुक्त करण्यास कारणीभूत आहे. 



अनिरुद्ध कवीश्वर -

आज द्रौपदी फिर...

 आज द्रौपदी फिर आक्रोश कर रही है लेकीन आज कृष्ण नहीं है l


द्रौपदी च्या सूडाच्या ज्वाळात संपूर्ण कौरव - पांडव अन् अनंत वीर भस्मसात झाले . निष्पन्न महाभारतात केवळ राखरांगोळी . 


सीतेला रावणाने कपटाने पळविले तेव्हा रामाने पिच्छा पूरवून रावणाचा वध केला अन् सोडवून आणले. लंका हनुमानानेच भस्मसात केली.

आज राम नहीं है l


आता मणिपूरच्या अग्निकल्लोळामधे अजून किती आहुती पडतील भगवान जाणे. 


युध्द कोई भी हो दोनो पक्ष में जलती तो स्त्री ही है l आदिवासी हो या क्षात्राणी हो या ब्राह्मणी हो !! 


आज रावण मरकर मी जिंदा है दूर्योधन की लालसा लसलस करते जिवीत है l द्रौपदी अब भी लांछित होती है l महाभारत आज भी चेतना जाग्रत करने वाला काव्य है l बडा दु:खदायी मंजर है l 


विकृतता प्रकृती का रुप लेकर सजी है और प्रकृती सब कुछ गव्हर्नमेंट करेगी आस लगाए बैठे है l जैसे शासन कोई जिन्न है l 


कारणे काहीही असोत, जे काही मणिपूर मधे चाललंय ते मनाला उद्विग्न करणारे आहे. भयभीत करणारे आहे. जीवाचा संताप संताप करणारे आहे.


अनिरुद्ध कवीश्वर -

वाणी

 सुप्रभात,


कधी कधी शब्द ओठातून बाहेर यायला नाराज असतात , कधी परिपूर्णतेला शब्दांची गरज भासत नाही , कधी भावनावेग अति तीव्र होतात अन् वाणी मूक होते . 


कधी वा रा कांत यांचे एक गीत आठवते ...


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे 


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?


कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू

आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे


गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची

आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे


मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे

वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे


मनाचा मनाशी होत असलेला संवाद उच्चारण्याची पात्रता वैखरीमधे असतेच असं नाही. पण कवींची प्रज्ञा तरल असते. त्यांच्या शब्दांमधे मनांत उमटलेले भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य असते.


ज्याला डोळ्यांतले भाव वाचता येतात त्याला शब्दांची ही अडचण होते . हृदयाची स्पंदने अन् जाणिवांचे स्फुरण स्वयंपूर्ण असते. 


मन सदैव प्रेम आणि वात्सल्याच्या भावनांनी ओथंबलेले राहो. 


अनिरुद्ध कवीश्वर -

 मन तरंग ...


कधी कधी अपेक्षाभंग , त्यानुषंगाने होणारी चिडचिड , मनाला आलेली मरगळ , कोरडी भावनांची गुंतावळ , अस्वस्थता , बेचैनी , दुनियादारी चा पोखरत रहाणारा भुंगा आणि अकारण आलेला थकवा ...

कोषात जाणे चांगले असे वाटू लागते. 


आपण सुखद अनुभूतींपेक्षा डागण्या देणार्या विचारांना कुरवाळत रहातो. अजून अजून अगतिकता जवळ करतो. निराशा आळवत रहातो. नकळत आपण एकलकोंडेपणा च्या आहारी जात आहोत हे समजत नाही.


आत्मिक समाधान आणि आनंद देणारा , मन प्रसन्न करणारा वेळ तेवढाच आपला स्वतः साठी जगल्याचा काळ . हा कॅनव्हास मोठा करणं आपल्याच हाती आहे. 


जीवन सुंदर आहे. जाणिवा विकसित करुन उपभोग घेता येतो. सौंदर्यानुभूती मनाची एक उच्च , तरल , शुभदायिनी  अवस्था आहे. 


अनिरुद्ध कवीश्वर -

ईश्वरेच्छा

 Good morning and have a wonderful day ahead 👍


I don't know who said it... "Knowing when to leave is important. The party , the job , the relationship."


जीवनामध्ये मोह , काम , क्रोध या गोष्टी शेवटपर्यंत जाता जात नाहीत. मन विचलीत करतात. 


त्यातही कामवासना फार प्रबळ किती ही नाही म्हटलं तरी बीजरुपानी शिल्लक असतेच. शरीराची साथ मिळो अथवा न मिळो धुगधुगी रहाते . भिन्नलिंगी व्यक्तींमधे आकर्षण ही निसर्गाची योजना आहे. मानसिक त्रास हा कामेच्छेचा आपण सहज स्वीकार न केल्याने होतो. 


शुचितेच्या कल्पनांचं ओझं वाहणं जमत नाही आणि टाकणं त्याहून कठीण. त्याच अनुषंगाने क्रोध त्याबरोबर आलेली अगतिकता ही मनाला कुरतडत रहाते. 


आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न घडणं ह्याचा दोष आपण इतरांवर किंवा स्वतः वर लादतो. मनस्ताप करुन घेतो. आपण एकप्रकारे आपल्या अंतरात्म्याला दुर्ल़क्षीत करुन नको त्या विचारांना कवटाळून बसतो . ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था आपणच करुन घेतो. 


त्यापेक्षा कर्तेपणा स्वतः कडे न घेता जे घडतंय त्यात ईश्वरेच्छा मानून प्रसाद स्वरुप स्वीकारणं यात समाधान आहे.


अनिरुध्द कवीश्वर -

तुम्हारा इंतजार हैं...

 सुप्रभात ,


वास्तविक जगाला विसरुन अनुभूती च्या उच्च स्तरावर तरंगत ठेवणारे शब्द अन् हेमंतदांचा मखमली स्वर... 


खूपदा अशी जुनी गाणी ऐकता ऐकता हवीहवीशी तंद्री लागते . 


हे नितांत सुंदर गाणे आणि त्यातील मृदुभाव उलगडून दाखवणारं रसग्रहण फार भावले मनाला . ज्यांनी कोणी केलंय त्याला धन्यवाद 🙏


अनिरुध्द कवीश्वर -

..............................................


*तुम पुकार लो*......


एखादा मोती हळूच घरंगळवा असे हमिंग.... अन् शुरुआत..आणि ..

हेमंत दा चा आवाज .

 हा आवाज ऐकायचा असेल तर मस्त ..निवांत..शांत रात्र हवी..प्रेयसी ची आठवणी च्या तरल अवस्थेत जायचे असेल .,तर हेमंत दा चे हे सृजन  शांततेत ऐका..


तुम पुकार लो..

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो..


ख्वाब चुन रही है रात बेक़रार है

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो...


. ...कुठेतरी नदीच्या काठावरतून पल्याड घेऊन जाणारे हे गाणे...चांदण्यात नाहलेली ही एक शांत रात्र...मनात प्रेयसी ची आठवण..

तिने यावं,तिची साथ हवी..तिची साद हवी आहे..कैक रात्र जणु होठा वर सांभाळून ठेवलेले काही एक जे तिला सांगायचे आहे ...एक आर्त स्वरात ..


होंठ पे लिए हुए

दिल की बात हम,..

जागते रहेंगे और

कितनी रात हम..

होंठ पे लिए हुए

दिल की बात हम

जागते रहेंगे और

कितनी रात हम...


प्रेमात पडावे तर असे...कोणासाठी झुरावे तर असे....ती सुगंधी जखम अनुभवावी..तो सल गोंजारावा..तिची आठवण अंगावरून झिरपू द्यावी तर अशी,जशी चांदणे झिरपते आहे जणु..एक एवढीच शी छोटी गोष्ट आहे...की,


मुक़तसर सी बात है

तुम से प्यार है

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो..


   हे गाणे ऐकताना ही शहारा येतो... नखशिखांत एक लहर धाऊन जाते..इतके नाजूक अलवार प्रेम...ह्या प्रेमाला कशाचाही स्पर्श नाही...असे,.


"दिल बेहल तो जाएगा इस ख़याल से

हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से

रात ये करार की बेक़रार है

तुम्हारा इंतज़ार है


ही अनावर ओढ,एक बेईचेनी....बाहेर पाऊस येण्याच्या अगोदर जे धुके येत आहे त्याचा सारखे..ह्या धुक्याची ओढणी करून पांघरून घ्यावे..आणि क्षितिजाच्या पार हळूच चालत निघावे..

नकळत ह्या गाण्याला मनानी दिलेली दाद च...अशी. वाह हेमंत दा ..वाह गुलज़ार जी..!!