Saturday, November 30, 2024

एकोहं बहुस्याम्

 *एकोहं बहुस्याम्*

स़ंतशिरोमणि ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेखिलेली 

" विश्वविकसित मुद्रा " ही एकोहं बहुस्याम् ची परिणिती आहे.

" यदन्तस् तद् बहि: | "

जे आंत आहे तेच बाहेर आहे 

" पिंडी ते ब्रह्मांडी " 

जे देह रुपात आहे ते ब्रह्मांडाचेच रुप आहे. 

यत्र स्थितमिदं सर्व कार्य |

यस्माच्च निर्गतम् |

तस्यानावृत्तरुपत्वान्न निरोधोsस्ति| 

कुत्रचित् ||२|| स्पंदकारिका 

स्पंदशक्तिमय संविद् अशा शिवाच्या स्फुरण मात्र संकल्पाने प्रवाहमान असणार्या स्पंदनांचे सृष्टी रुपाने प्रसरण होते. त्या शिवशक्तिला कोणतेही आवरण झांकू शकत नाही तसेच त्यांचे प्रसरण  ही रोखू शकत नाही.

या शिवशक्ती चे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज समजावतात-

ज्या एका सत्तेचे बैसणे |

दोघा एका प्रकाशाचे लेणे |

जे अनादी एकपणे |

नांदती दोघे ||८|| अमृतानुभव प्र-१

जया ( प्रकृति - पुरुष ) एका ब्रह्माच्याच चित्प्रकाशाने प्रकाशली गेली आहेत.  अनादी कालापासून एका अधिष्ठान ब्रम्हचैतन्याहून वेगळी नाहीत असे हे निखळ ब्रह्मच जगत् रूपाने विकसित झाले आहे.

प्रकृती-पुरुषा मध्ये सृष्टीच्या दृश्यमानतेमुळे द्वैत्व भासमान  होत असले तरी त्यामध्ये अभेदत्त्व आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे अद्वैताच्या सिद्धांताकडे आपले लक्ष वेधतात.

ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अतिशय मधुर आहे. सर्वसामान्यांना समजू शकेल अशा सोप्या भाषेमध्ये अनेक उदाहरणे देऊन ते उलगडून सांगतात. 


कैसा मेळू आला गोडीये |

दोघे न माती जगीं इये | 

की परमाणुहि माजी उवावे | 

मांडिली आहाती || ११||   अमृतानुभव प्रकरण १ 


प्रकृति पुरुषाच्या मेळा संबंधी वर्णन करताना महाराज म्हणतात की त्यायोगे 

प्रकृति- पुरुष एवढी वाढली , प्रसरण पावली की जगतात मावेनाशी झाली . तथापि अतिसूक्ष्म अशा परमाणु मध्येही ती दोघे नांदत आहेत. 

हेच संत तुकाराम महाराज वेगळ्या शब्दांमध्ये वर्णन करतात. 

"अणूरेणिया थोकडा तुका झाला आकाशाएवढा"

अणुरेणूं पेक्षाही सूक्ष्मतर वस्तुमानापासून आकाशापेक्षाही मोठ्या वस्तुमात्रां पर्यंत मी व्याप्त आहे. 


वर्तमानावभासानां भावनाभवभासनम् | 

अंत:स्थितवतामेव घटते बहिरात्मना || १.५.१ ई प्र वि 

( ईश्वर- प्रत्यग्भिज्ञा - विमर्शिनी )


बाह्यरुपात अवभासित वस्तुमात्र भिन्न सत्ता नसून आंतरिक चैतन्य सत्तेचाच बाह्य प्रसार आहे. एकातून अनेकत्व प्रसरण पावते तरी त्या प्रत्येकात एकत्व अंतर्निहित आहे .

तैतरियोपनिषदातील याचे वर्णन   


" रसो वै स: "  असे केले आहे. 

चित्-रसात्मक तरलता स्वतःच आपल्या स्वातंत्र्य वृत्तीने स्फुरण पावून भावनात्मक घनता स्वीकारते . घनता जितकी दृढ होत जाते तितकी जडता प्राप्त होते . घनीभवनाची अंतिम सीमा पृथ्वीतत्व आहे. 

भारतीय तत्त्वज्ञान सृष्टीच्या निर्मितीच्या तत्त्वांचा शोध घेते त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सज्ञांचा उपयोग होतो . या स्पंदशक्ती शास्त्राची आधुनिक विज्ञानाच्या क्वांटम फिजिक्स ,  क्वांटम मेकानिक्स या शाखेशी  जोडलेली नाळ आपल्या लक्षात येईल . फक्त तत्कालीन संस्कृत किंवा प्राकृत भाषांमधील टर्मिनोलॉजी वेगळी आहे ते सहाजिकच आहे.

Quantum physics is the study of matter and energy at the most fundamental level.  It aims to uncover the properties and behaviour  of the very building blocks of nature. 

सूक्ष्मातिसूक्ष्म मूलकणांच्या प्रचलनाचा व त्याच्या प्रतिक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा पुंज विज्ञानाचा गाभा आहे. 

याच तत्त्वाचा अभ्यास शिवसूत्रामध्ये , ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभव मध्ये केलेला आहे.  याच विषयावरील स्पंदकारिका हा ग्रंथ आठव्या शतकात भट्टकलट याने लिहिला आहे . गुरु वसुगुप्ताच्या शिकवणीतील श्लोकांचे ते संकलन आहे . 

काश्मिरी विद्वान आचार्यांची परंपरा अक्षुण्ण आहे. परकीय आक्रमणाने ती खंडित झालेली नाही या काश्मिरी शैविझम् या ज्ञान परंपरेतील आधुनिक काळातील गुरु  ' लक्ष्मण जु ' होत . स्पंदकारिका ग्रंथांचे हिंदी भाषांतर करणार्या आचार्य नीलकंठ गुर्टु या विद्वान कश्मीरी पंडित लेखकाचा मृत्यू दिल्लीमध्ये अलीकडच्या काळात म्हणजे डिसेंबर 2008 मध्ये झाला.  

काश्मीर ते थेट महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर महाराजांच्या नेवासे इथपर्यंत झालेला शिवसूत्रांचा प्रवास अभ्यासण्या जोगा आहे. अतिशय समृद्ध असे तत्वज्ञान आणि तितकीच प्रवाहमान असलेली ज्ञानाची परंपरा भारताचे वैभव आहे. 

शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

हे विश्व रूपाचे सोहळे |

भोगूनी निवले जी डोळे |

होताति आंधले | 

कृष्णमूर्तीलागी || (११.६०६ ) ज्ञानेश्वरी 


हे श्रीकृष्ण परमात्मा तुझे जगत् रुपातील प्रगट सोहळे पाहून , भोग - उपभोग घेऊन डोळे निवले . आता अंतर्मनातील कृष्णरूपा व्यतिरिक्त कशाची आस राहिली नाही .

असा हा सृष्टीद्वारे भोग आणि योग अनुभवास आणणारा , शेवटी सर्व स्वतः मध्ये विलीन करुन घेणारा सखा ,  ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा अन् ओळखता ही यावा.

अनिरुध्द कवीश्वर -

Monday, November 18, 2024

विश्वविकसित मुद्रा

 सुप्रभात🙏🏻🌹 , 

" विश्वविकसित मुद्रा " अध्याय १७ ज्ञानेश्वरी 

संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्य सृष्टीच्या वर्णनासाठी एक वेगळाच शब्द योजिला आहे. " विश्वविकसित मुद्रा " 

या दृष्य विश्वाचे ज्ञान आणि स्वरुप समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यायोगे आपल्या अस्तित्वाविषयक संबंधाने यथार्थ जाणिव होणार नाही.

या दृष्य जगताची उत्पत्ती , या सृष्टीतील आपले स्थान आणि वस्तमात्राशी असलेला परस्पर संबंध यांचे यथास्थित ज्ञान झाल्याखेरीज कार्यकारणभाव समजणार नाही.

जे माया वस्तूंच्या ठायी |

असे जैसेनी नाही|

मग वस्तुप्रभाचि पाही |

प्रगट होते ||१५-८४ ज्ञा. 


हा चिद्विलास कसा आहे -

विश्व भासतसे जेणे | लपालेनी |

मग वस्तुप्रभाचि पाही | प्रकट होत | 

अदृष्य मान असलेल्या चैतन्यशक्तिच्या प्रसरणाने दृष्यमान झालेली वस्तु प्रभा , हीच सृष्टी प्रकट झाली. भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणतात अशा दृष्य सृष्टी मुळे मी लोपल्यासारखे भासले तरी जगरुपे कोण दिसतो ? 

हे अव्यक्त पणे थिजले |

तेचि मग विश्वासाने वोथिजले |

तैसे अमुर्तमुर्ति मिंया विस्तारले |

त्र्यैलोक्य जाणे || ९-६६ ज्ञानेश्वरी


जे अव्यक्त , केवळ स्पंदशक्तीरुपाने थिजल्यासारखे ( Potential Energy ) आहे तेच विश्वरुपात मूर्तीचे साकारले , विस्तारले आ हे. जे चलियमान ( Kinetic energy )भासते.


 सांगे पां धनंजया |

अवयवी अवयविया |

आच्छादिजे की तया |

तेंचि रुप || १०-२५६ 

ज्ञानेश्वरी विज्ञान दर्शन


सारा कल्पनाशक्तिचा खेळ आहे. एका दृष्टीनी अवयव देहाला झांकतात की अवयवांमुळेच देहाला रुप प्राप्त होते ?

भगवान श्रीकृष्ण म्हणतात , आत्मज्ञानाच्या दृष्टीने सर्व चराचर माझ्यापासून भिन्न नाही. अव्यक्त अशा स्पंदशक्तीच्या लहरींचा विलास तुझ्यात आहे. अत: आत्मरुपाने तूच आहेस. 

आत्मभान लोप पावल्या मुळे सर्व भिन्न भिन्न भासमान आहे. 

इंद्रियगामी झालेल्या मन:शक्तीला विश्व विस्तारलेले वाटते. त्याचं मन:शक्तीला इंद्रियांपासून ओढून अंतर्गामी प्रवृत्त केले असता प्रतिप्रसव प्रक्रिया सुरु होते . तसेच आपला व सृष्टीचा असलेला परस्पर संबंध समजतो. 

एका दृष्टीनी ज्ञानेश्वर महाराज द्वैतभावातून अद्वैत भावाकडे आपला प्रवास घडवून आणतात. 

एकदा का आपण या भूमिकेवर स्थिर झालो की सृष्टीतील यच्चयावत वस्तुमात्र , प्राणीमात्रांशी असलेले संदर्भ बदलतात. 

सामाजिक उन्नयनाच्या दृष्टीने पहाता व्यष्टी आणि समष्टी मधे परस्परसंबंध कसे असावेत याचे ही मार्गदर्शन होते. वरवर पहाता दिसणाऱ्या भेदातील अभेदतत्त्व जाणण्यास मदत होते. सामाजिक स्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. 

तो श्रीकृष्ण तुम्हाला कोणत्याही स्वरुपातून उचित मार्गदर्शन करीत असतो. भग ते व्यक्तिरुपाने असो की विचार रुपाने असो. 

असा हा ज्याचा त्याचा श्रीकृष्ण ज्याला त्याला भेटावा अन् ओळखता ही यावा. 

अनिरुध्द कवीश्वर -

Saturday, May 18, 2024

नागालँड

 *नागालँड एक समृध्द निसर्गाचा  आणि अतिथ्यशीलतेचा परिचय देणारा प्रदेश....*

आम्ही नागालँड मधे गेलो होतो तेव्हा प्रत्यक्ष नागा लोकांच्या घरात दिवसभर राहून त्यांची कम्युनिटी आणि दिनचर्या पाहिली होती. 

भौगोलिक स्थिती आणि रीतीभाती अशी काही वैशिष्ट्ये सोडली तर मानवी स्वभाव सर्व ठिकाणी सारखाच असतो. या नागा लोकांमधे ज्यांच्याविषयी आस्था असते , आदरभाव दाखवायचा असतो त्यांना ते थेट स्वयंपाकघरात नेतात. 

आपुलकी दर्शवण्यासाठी ते सफरचंदासारख्या एका फळांची मंदिरा छोट्या पेल्यात स्वतः च्याच हातांनी ऑफर करतात. त्यांनी दिलेला तो मान म्हणून प्रत्येकांनी पहिला पेग घ्यावा असा संकेत आहे. त्यानंतर तुम्ही घ्या किंवा नका घेऊ पण पहिला त्यांनी दिलेला स्वीकारावा लागतो. आम्ही सर्वांनी त्यांचा मान राखला. चव अत्यंत सुंदर होती. पारंपारिक पध्दतीनी बनवतात. 

आम्ही सर्व निरामिष जेवणारे म्हणून यजमान स्त्री ने डाळ , भात , बटाट्याची भाजी आणि कांदा , मुळा असे सॅलड केले होते. यजमान स्वतः मात्र जेवून कामावर निघून गेले होते. तिथे अशी पध्दत आहे की पहिले अन्न ते वाढतात अन् नंतर सर्व शिजवलेलं अन्न एका ठिकाणी आणून ते स्वयंपाक घराबाहेर जातात. पुढे सर्व तुम्ही तुमच्या हातांनी परसून घ्यायचे. ते तुम्ही जेवत असताना तिथे थांबत नाहीत. कारणं काही असोत. पण त्यामुळे अतिथी धर्माला झळ पोहोचत नाही. तिथली परंपरा जपण्याचा तो एक मार्ग आहे. 

स्वयंपाक घरात कपडे लटकवतात तशा भरीव बांबूवर मांस वाळत ठेवलेले होते . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सुकलेल्या मांसाचा अजिबात दुर्गंध नव्हता. काय कारण असेल माहित नाही . घर साधेच मातीचे लिंपण केलेले पण स्वच्छ होते. तीन खोल्यांचे घर होते. या घरात सात जणांचे कुटुंब रहात होते. नवरा-बायको , दोन मुलं तीन मुली . मोठी मुलगी आईला मुलं सांभाळण्यात मदत करत होती. 

टेकाडावर सर्व वस्ती होती. मधल्या भागात शासकीय मदतीनी सभा घेण्यासाठी गोलाकार पण उघडी  जागा बांधून घेतली होती. 

डोंगर उतारावर एका बाजूला पहाडातून येणारे पाणी साठवणुकीसाठी तिथलेच दगड कोरुन टाक्या बनवल्या होत्या. सततच्या धारेमुळे ओसांडून वाहणार्या पाण्याची अशी रचना केली होती की त्याखाली सचैल स्नान करता येईल. स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या वेळा नेमून दिलेल्या होत्या . कपडे धुण्यासाठी पण तीच व्यवस्था अंमलात आणली होती. 

बहूतेक सर्व पुरुष पहाटे सहा ते संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत शेतात काम करतात . अथवा अन्य घरातील लागणार्या वस्तू आणण्याचे काम करतात. स्त्रिया दिवसभर मुलांना सांभाळणे , स्वैपाक करणे आणि विशिष्ट प्रकारच्या काळ्या आणि लाल रंगांचे धागे वापरुन घरच्या हातमागावर विविध वस्तू जसे मफलर , झोळ्या ,  कानटोप्या , शाल वगैरे विणण्याचे काम करतात. आपण अवश्य तिथे खरेदी करुन त्यांच्या स्वावलंबित्वाच्या प्रयत्नांना हातभार लावावा. 

डोंगर माथ्यावर एक पुराणा दगड-मातीनी बांधलेला किल्ला होता. आज त्यांची बरीच पडझड झाली आहे. आम्ही तो पहाण्यासाठी वर चढून गेलो. तिथे फोटोसेशन केले. वरुन सभोवतालचा सारा परिसर फार सुंदर दिसतो. 

डोंगराच्या पायथ्याशी दोन बहिणींनी चालवलेले एक रेस्टॉरंट ही होते. अंतर्गत रचना निसर्गाशी जुळवून घेणारी , रंगीत तसंच आधुनिकतेचा स्पर्श असणारी होती. कमालीची स्वच्छता आणि टापटीप होती. बहूधा बरेच टूरिस्ट इथे येत असावेत.आम्ही इथे चहा घेतला. सफरचंदसदृष फळांच्या फोडी वाळवून त्या जेवणा नंतर खाण्याची इथे पध्दत आहे. आम्ही ते आमच्यासाठी विकत घेतलं. स्वादिष्ट चव होती. 

एक वेगळाच व्यवसाय एका घर-दुकान चालणार्या स्त्री ने सुरु केला होता. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी तिने दुकानाशेजारी एक आधुनिक पध्दतीचे टॉयलेट कम बाथरुम बांधून घेतले होते. कमालीचे स्वच्छ राखले होते. डोंगर चढून किल्ला पाहून येणार्या प्रवाश्यांची चांगली सोय केली होती. दहा रुपये चार्ज घेत होती. पण अत्यंत गरजेची वास्तू बांधल्या मुळे प्रवासी स्वच्छता पाहून आश्चर्यचकीत होऊन पैसे देत. 

कधीकाळी नागालँड मधे मॅन इटर्स होते. आज ती जमात त्यातून बाहेर आली आहे. एकंदरीतच निसर्गाशी जुळवून घेत स्वास्थ्य पूर्ण जीवन जगण्याची त्याचबरोबर आधुनिकतेशी नाळ जोडून घेण्याची त्यांची मानसिक लवचिकता पाहून  मनुष्याच्या उत्तरोत्तर प्रगतीशील होण्याच्या सहज वृत्तीचा परिचय देत  होती. 

जरुर पहावा , जाणून घ्यावा असा प्रदेश . 

अनिरुध्द कवीश्वर -

Saturday, December 30, 2023

भीमेश्वर महादेव मंदिर , सामलकोट

 *भीमेश्वर महादेव मंदिर, सामलकोट, आंध्रप्रदेश*

सामलकोट जवळ चालुक्यांच्या राजवटीत बांधलेले नवव्या शतकातील भीमेश्वर महादेव मंदिर आहे. फार प्रशस्त आवार त्याला चहूबाजूंनी पंधरा फूट उंच परकोट बांधलेला आहे. परकोटाचे बांधकाम कोकणातील जांभा दगडासारख्या सच्छिद्र दगडांंचे आहे. इथे गौमुखा ऐवजी गजमुख आहे. याचा अर्थ मंदिर राजांनी बांधले आहे. 

मूळ मंदिरात चारी बाजूंनी प्रवेशद्वार आहे. शिवलिंग दोन मजल्यांपेक्षा उंच आहे. त्यात वाढ होत असते अशी आख्यायिका ऐकायला मिळाली. मंदिरा च्या दगडी खांबांवर सुंदर नक्षी कोरलेली आहे. चारी बाजूंनी दगडी चौथरे बांधून काढले आहेत. कार्तिकेय स्वामी , विष्णू , दुर्गा अशा देवतांच्या मुर्त्या सुध्दा आहेत. सर्व भाग झाडून स्वच्छ असतो. महाशिवरात्री ला भाविकांची खूप गर्दी असते. 

मंदिरा च्या मागील बाजूस अर्ध्या एकरात पुष्करणी आहे. स्नानासाठी कठडे बांधले आहेत . परिसर एकदम स्वच्छ आहे. मी गेलो त्यावेळी पुष्करणी मधे भरपूर पाणी होते. पुष्करणी जवळ परकोटाचे एका बाजूस प्रचंड वटवृक्ष आहे. 

कार पार्किंग साठी मंदिरा बाहेर खूप मोठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. पीठापूर मधे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानात दर्शनासाठी आलेल्यांनी जरुर भीमेश्वर ला भेट द्यावी . पीठापूर वरुन कार नी साधारणतः अर्ध्या तासात या मंदिरापाशी पोहोचता येतं. 

रस्ता निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. नारळाचे वृक्ष भातशेतीच्या बांधावर हारीनी लावलेली दिसतात. भाताची शेती पाणथळ जागेत असल्यामुळे पांढरे बगळे ही खूप दिसतात. हिरव्या रंगाच्या विविध शेडस् पाहून डोळे निवतात. मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. 

भारतवर्ष निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आपल्या मुलाबाळांना अवश्य भारताच्या चार ही दिशांना घेऊन जा. त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होऊ द्या. 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, December 27, 2023

हरक्षण

 सुप्रभात 🙏🌹 , 


खरंतर वर्ष अखेरीस  अनुभव का मोजावा ?  हर क्षण  आयुष्य बदलत असते. प्रत्येक क्षण नवीन , जाणिवा समृध्द करणारा असतो. 

मन प्रसन्न असले की उत्साह द्विगुणित होतो. आपल्याला काय हवे आहे यापेक्षा आपण काय देऊ शकतो हा विचार एकदा मनात रुजला की इंद्रिये जोमाने कामाला लागतात. 

निसर्ग आपल्यापरीने सृष्टीला नवजीवन देत असतो. सूर्योदय , सूर्यास्ताच्या नित्यनूतन रंगछटा  दृष्टीसुख देतात . सागराच्या गाज , नद्यांचे खळखळाट करत वाहणारे पाणी , पक्षांची कुजबुज , गाईंचे हंबरणे असो की सिंहगर्जना , रंगीबेरंगी ताजी फुले  , सोनचाफा , मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का शुभ्र रंगाची असली तरी त्यांचा सुगंधी दरवळ केवळ आनंद देतो. 

जसं देता आलं पाहिजे तसं स्वीकारता ही आलं पाहिजे. किती दिवस झाले निसर्ग लुटत असलेला हा आनंद घेऊन आठवून पहा म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना मुकत आहोत याची जाणीव होईल.‌

पहाटे नदीकाठी पाण्यात पाय टाकून निवांत बसून पहा , झुंजूमुंजू होताना मंदिरातील घंटानाद ऐकून किती दिवस झाले ?  संध्याकाळी समुद्रकिनार्यावरील भन्नाट वार्यात मऊशार वाळूत अनवाणी फिरुन किती काळ लोटला ?    अंधारात लुकलुकणारे तारे कधीचे लक्ष वेधत आहेत कधी त्यांच्याकडे पाहिलं आठवतंय का ?  निळ्यासावळ्या आकाशाकडे मनसोक्त डोळे भरुन पाहिले का ?

जिथे तिथे हरक्षणी त्याचा  तो मोरपंखी स्पर्श आठवण करुन देतो . तो सदैव सोबत आहे. 

मनामनांत डोकावणारा... कृष्ण !!

ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🌹

अनिरुध्द कवीश्वर -

बेमुर्वतपणे...

 बेमुर्वतपणे धबधब्यासारखे उड्या घेणे म्हणजे स्वैर जगणे . आपल्याच धुंदीत झुलणे. कधी अवखळपणे , कधी शांतपणे वाहणे  , मधेच थबकणे तर कधी डोहातले हळुच डहुळणे. 

मनानी मनाशी केलेला संवाद आपल्यालाच ऐकू येणारा . आत्ममग्नतेत तन्मय होणारा. स्वयंस्फूर्त !! संतुष्ट होण्यासाठी अविरत गुजबुज. 

कलंदर होणे सोपे नाही. बरेच काही मागे सोडून नित्य नव्यानं , कुतूहलानं स्वीकारण्याची मानसिकता धारण करणे ही पहिली पायरी. 

येईल त्याला सामोरे जात पाण्यासारखं कचरा किनारी फेकत खळाळत स्वच्छंदपणे काळाला आपल्या मागे धावायला लावणं.

जीवन जगण्याची परिभाषाच बदलून जाते.  इतरही केवळ आपल्या उत्साही पणाने उद्युक्त होतात. 

मन प्रसन्न करण्यासाठी सहज , स्वयंस्फूर्तीने वाटचाल करावी . त्यातला अनुपम आनंद  लुटावा. 

🙏🙏


अनिरुध्द कवीश्वर -

Monday, December 25, 2023

पृथ्वीचे दोहन

 पृथ्वीचे दोहन आणि शोधन ज्याप्रकारे होईल त्याचप्रकारे त्यांचे परिणाम होतील. पूर्व काळात गौ आणि गौदुग्धाचे दोहन आणि  कृषि उत्पादनाचे शोधन  होत होते. निसर्गाशी जवळीक साधून होत असल्यामुळे एकप्रकारचा समन्वय होता. त्यामुळे शांत , समाधानी जीवन होते. 


आजच्या काळामध्ये यंत्र आणि तंत्राचे दोहन , शोधन होते. त्यामुळे जीवन ही यंत्रवत् झाले आहे. 


याकरीता मानवी जीवनाचे उन्नयन कुठल्या मार्गांनी करायचे याचे विवेचन भगवद्गीतेत कृष्णानी सांगीतले. गीता म्हणजे उपनिषदांचे दोहन आणि मानवी जीवनाला पूर्णत्व आणण्याचे शोधन . 


यंत्र म्हणजे कर्मेंद्रियांचे एकप्रकारे एक्स्टेंशन. कोणत्याही काळात ज्ञानेंद्रिये मात्र तीच आहेत.  याकरीता कृष्णाचा उपदेश कालातीत आहे.


ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 


अनिरुध्द कवीश्वर -