Saturday, December 30, 2023

भीमेश्वर महादेव मंदिर , सामलकोट

 *भीमेश्वर महादेव मंदिर, सामलकोट, आंध्रप्रदेश*

सामलकोट जवळ चालुक्यांच्या राजवटीत बांधलेले नवव्या शतकातील भीमेश्वर महादेव मंदिर आहे. फार प्रशस्त आवार त्याला चहूबाजूंनी पंधरा फूट उंच परकोट बांधलेला आहे. परकोटाचे बांधकाम कोकणातील जांभा दगडासारख्या सच्छिद्र दगडांंचे आहे. इथे गौमुखा ऐवजी गजमुख आहे. याचा अर्थ मंदिर राजांनी बांधले आहे. 

मूळ मंदिरात चारी बाजूंनी प्रवेशद्वार आहे. शिवलिंग दोन मजल्यांपेक्षा उंच आहे. त्यात वाढ होत असते अशी आख्यायिका ऐकायला मिळाली. मंदिरा च्या दगडी खांबांवर सुंदर नक्षी कोरलेली आहे. चारी बाजूंनी दगडी चौथरे बांधून काढले आहेत. कार्तिकेय स्वामी , विष्णू , दुर्गा अशा देवतांच्या मुर्त्या सुध्दा आहेत. सर्व भाग झाडून स्वच्छ असतो. महाशिवरात्री ला भाविकांची खूप गर्दी असते. 

मंदिरा च्या मागील बाजूस अर्ध्या एकरात पुष्करणी आहे. स्नानासाठी कठडे बांधले आहेत . परिसर एकदम स्वच्छ आहे. मी गेलो त्यावेळी पुष्करणी मधे भरपूर पाणी होते. पुष्करणी जवळ परकोटाचे एका बाजूस प्रचंड वटवृक्ष आहे. 

कार पार्किंग साठी मंदिरा बाहेर खूप मोठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. पीठापूर मधे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानात दर्शनासाठी आलेल्यांनी जरुर भीमेश्वर ला भेट द्यावी . पीठापूर वरुन कार नी साधारणतः अर्ध्या तासात या मंदिरापाशी पोहोचता येतं. 

रस्ता निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. नारळाचे वृक्ष भातशेतीच्या बांधावर हारीनी लावलेली दिसतात. भाताची शेती पाणथळ जागेत असल्यामुळे पांढरे बगळे ही खूप दिसतात. हिरव्या रंगाच्या विविध शेडस् पाहून डोळे निवतात. मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. 

भारतवर्ष निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आपल्या मुलाबाळांना अवश्य भारताच्या चार ही दिशांना घेऊन जा. त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होऊ द्या. 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, December 27, 2023

हरक्षण

 सुप्रभात 🙏🌹 , 


खरंतर वर्ष अखेरीस  अनुभव का मोजावा ?  हर क्षण  आयुष्य बदलत असते. प्रत्येक क्षण नवीन , जाणिवा समृध्द करणारा असतो. 

मन प्रसन्न असले की उत्साह द्विगुणित होतो. आपल्याला काय हवे आहे यापेक्षा आपण काय देऊ शकतो हा विचार एकदा मनात रुजला की इंद्रिये जोमाने कामाला लागतात. 

निसर्ग आपल्यापरीने सृष्टीला नवजीवन देत असतो. सूर्योदय , सूर्यास्ताच्या नित्यनूतन रंगछटा  दृष्टीसुख देतात . सागराच्या गाज , नद्यांचे खळखळाट करत वाहणारे पाणी , पक्षांची कुजबुज , गाईंचे हंबरणे असो की सिंहगर्जना , रंगीबेरंगी ताजी फुले  , सोनचाफा , मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का शुभ्र रंगाची असली तरी त्यांचा सुगंधी दरवळ केवळ आनंद देतो. 

जसं देता आलं पाहिजे तसं स्वीकारता ही आलं पाहिजे. किती दिवस झाले निसर्ग लुटत असलेला हा आनंद घेऊन आठवून पहा म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना मुकत आहोत याची जाणीव होईल.‌

पहाटे नदीकाठी पाण्यात पाय टाकून निवांत बसून पहा , झुंजूमुंजू होताना मंदिरातील घंटानाद ऐकून किती दिवस झाले ?  संध्याकाळी समुद्रकिनार्यावरील भन्नाट वार्यात मऊशार वाळूत अनवाणी फिरुन किती काळ लोटला ?    अंधारात लुकलुकणारे तारे कधीचे लक्ष वेधत आहेत कधी त्यांच्याकडे पाहिलं आठवतंय का ?  निळ्यासावळ्या आकाशाकडे मनसोक्त डोळे भरुन पाहिले का ?

जिथे तिथे हरक्षणी त्याचा  तो मोरपंखी स्पर्श आठवण करुन देतो . तो सदैव सोबत आहे. 

मनामनांत डोकावणारा... कृष्ण !!

ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🌹

अनिरुध्द कवीश्वर -

बेमुर्वतपणे...

 बेमुर्वतपणे धबधब्यासारखे उड्या घेणे म्हणजे स्वैर जगणे . आपल्याच धुंदीत झुलणे. कधी अवखळपणे , कधी शांतपणे वाहणे  , मधेच थबकणे तर कधी डोहातले हळुच डहुळणे. 

मनानी मनाशी केलेला संवाद आपल्यालाच ऐकू येणारा . आत्ममग्नतेत तन्मय होणारा. स्वयंस्फूर्त !! संतुष्ट होण्यासाठी अविरत गुजबुज. 

कलंदर होणे सोपे नाही. बरेच काही मागे सोडून नित्य नव्यानं , कुतूहलानं स्वीकारण्याची मानसिकता धारण करणे ही पहिली पायरी. 

येईल त्याला सामोरे जात पाण्यासारखं कचरा किनारी फेकत खळाळत स्वच्छंदपणे काळाला आपल्या मागे धावायला लावणं.

जीवन जगण्याची परिभाषाच बदलून जाते.  इतरही केवळ आपल्या उत्साही पणाने उद्युक्त होतात. 

मन प्रसन्न करण्यासाठी सहज , स्वयंस्फूर्तीने वाटचाल करावी . त्यातला अनुपम आनंद  लुटावा. 

🙏🙏


अनिरुध्द कवीश्वर -

Monday, December 25, 2023

पृथ्वीचे दोहन

 पृथ्वीचे दोहन आणि शोधन ज्याप्रकारे होईल त्याचप्रकारे त्यांचे परिणाम होतील. पूर्व काळात गौ आणि गौदुग्धाचे दोहन आणि  कृषि उत्पादनाचे शोधन  होत होते. निसर्गाशी जवळीक साधून होत असल्यामुळे एकप्रकारचा समन्वय होता. त्यामुळे शांत , समाधानी जीवन होते. 


आजच्या काळामध्ये यंत्र आणि तंत्राचे दोहन , शोधन होते. त्यामुळे जीवन ही यंत्रवत् झाले आहे. 


याकरीता मानवी जीवनाचे उन्नयन कुठल्या मार्गांनी करायचे याचे विवेचन भगवद्गीतेत कृष्णानी सांगीतले. गीता म्हणजे उपनिषदांचे दोहन आणि मानवी जीवनाला पूर्णत्व आणण्याचे शोधन . 


यंत्र म्हणजे कर्मेंद्रियांचे एकप्रकारे एक्स्टेंशन. कोणत्याही काळात ज्ञानेंद्रिये मात्र तीच आहेत.  याकरीता कृष्णाचा उपदेश कालातीत आहे.


ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 


अनिरुध्द कवीश्वर -