बुध्दीभेद झाल्यामुळे ' घडी घडी विघडे निश्चयो मनाचा ' अशी अवस्था प्रत्येक मनुष्य अनुभवत असतो.
संत रामदास करुणा भाकतात..
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरें आवरीता
तुजविण शीण होतो धांव रे धांव आता ll१ll
संत तुकाराम महाराज म्हणतात...
संसारतापे बहू तापलो देवा
करिता सेवा या कुटुंबाची
' अमृताहूनी गोड नाम तुझे देवा ' या अभंगांमधून संत नामदेवांनी देखिल आपले दु:ख बोलून दाखविले आहे.
कीर्तनी बैसता नेत्र नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा ll३ll
असे हे चंचल मन सांसारिक त्रासानी त्रासले तरी पुन्हा पुन्हा मोहात पडते. मांजर जशी उंदराला भीतिच्या छायेखाली खेळवत खेळवत मारते तशी मोहमाया हाती सापडलेल्या जीवाला सहजासहजी सोडत नाही. विरक्त जरी होऊ लागला की प्रलोभनांनी भुलविते. नच भुलला तर त्रास द्यायला सुरुवात करते. मनोबल तुटेल असं पाहते. शंकांद्वारे बुद्धीभेद करुन मानसिक आंदोलनांमध्ये झुलवत ठेवते. विषयसुखात क्षणिक आनंद असला परीणामस्वरुप कष्टांना परिसीमा नसते.
सदगुरु खरे विश्रामधाम !!
आपल्या मनामधे उपजणा-या शंकांचे निरसन करुन नामस्मरणाद्वारे भक्तिचा खुंटा बळकट करणारे सदगुरु खरे विश्रामधाम.
एकदा श्रीराम महाराजांच्या दर्शनासाठी नावघाटखेडी ला गेलो होतो . सोबत माझे मित्र सुहास मोरे पती-पत्नी आणि विटकर हे होते. श्रीराम महाराजांची भेट झाली. माझ्या मनात सहज इच्छा झाली की अनायासे इथे आलो आहोत तर महाराजांसमोर बसून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करावा. मी महाराजांना मनातली इच्छा बोलून दाखवली. मनातल्या संकल्पाला लगेच त्यांनी होकार दिला. मला वाटलं महाराज किती वेळ देऊ शकतील माहित नाही मग किमान तेरा वेळा तरी जप करावा. मी तसे बोलून दाखवले तर म्हणाले एकशेसाठ वेळा करा. त्यानुसार आम्ही चौघांनी मिळून एकशेसाठ वेळा " श्रीराम जयराम जय जय राम " या मंत्राचा जप केला. मन भरुन पावलं.
सांगण्याचा उद्देश नामस्मरणासाठी सदगुरुंपाशी वेळचवेळ असतो. किंबहूना ते सतत नामांतच असतात. शिष्यांनी सुध्दा वेळ काळ याचा विचार न करता नामस्मरण करत रहावं. महाराजांनी प्रत्यक्ष वागण्यातून दाखवून दिलं.
या नामस्मरणानी निश्चयात्मिका बुद्धी परमेश्वर चरणी स्थिर होते. एकदा का भक्तिचा मळा फुलला की वृत्ती आपोआपच पालटतात. मग संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे झाले तर ...
नलगे मुक्ति धनसंपदा
संतसंग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी
अशी मनाची स्थिती होते. याचसाठी...
उपासनेला दृढ चालवावे
भूदेव संतांसी सदा नमावे
सत्कर्म योगे वय घालवावे
सर्वामुखी मंगल बोलवावे.
जय जय रघुवीर समर्थ .