Monday, October 19, 2020

मुक्ती

                    आयुष्य म्हणता म्हणता उडून जाईल . अहंकार आणि स्वाभिमान यातली रेघ अतिशय पुसट आहे. भावनेच्या भरात आपण नकळत अहंकार तर जोपासत नाही ना ? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारुन पहावा. कोणी कोणाचे नसते असं जरी असलं तरी आपण स्वीकारलेली नाती तर खरीच असतात नं. स्वतःला मुक्त करण्याच्या नादात आपण कोषात तर जात नाही ना याचा विचार करणे गरजेचे आहे. आयुष्य क्षणभंगूर असलं तरी भावनांनी खुलवता येऊ शकतं फक्त डोळसपणे नात्यांकडे , व्यक्तिंकडे पहाता यायला हवं. 👍🏼

                  वास्तविक पहाता आपल्याला जे दृष्टोत्पत्तीस येतं ते आपलंच स्वरुप असतं. आपण सर्वांमधे स्वत:ला अवलोकित करत असतो. पुष्कळवेळा आपलेच गुणदोष जाणवतात. 

         आत्मचिंतनासाठी वेळेची मर्यादा नाही. कारण काळ विचारसापेक्ष आहे. 

 🙏🏼

Thursday, October 15, 2020

विट्ठल उभा विटेवरी

                     मला खूप वेळा प्रश्न पडतात आणि मी त्यावर मनन करीत रहातो. पण आपला विचार , आपली समजूत बरोबर आहे का ? हे जाणून घ्यायची मनोमन इच्छा असते.    

           काही काही वेळेला प्रश्न पडतात की शब्दांची उत्पत्ती अशीच होत नाही त्यामागे काही विशेष बाब असू शकते. अमुक एक नाम  असण्यामधे सुध्दा काही अर्थ असावा . 

            वारकरी म्हणतात तसा "विटेवरी ठेला" हा मला भक्त पुंडलिकाच्या कथे संदर्भात सहज सोपा वाटतो. 

               आता ही विट कुठली ? सामान्यपणे ही माती भाजून केली वीट जी पुंडलीकाने आई-वडिलांच्या सेवेत असल्याकारणाने भगवंताला वाट पाहीस्तोवर उभं रहाण्या साठी म्हणून दिली. जी कथा सर्वमान्य आहे. 

             मला असं वाटतं की भगवंत असे सूचवू पहात आहेत की या प्रपंचातले सर्व दु:खभोग भोगून झाले , इंद्रियसुखे उपभोगून झाली  दोन्ही सम समा झाले आता या सर्व गोष्टींचा वीट आला आहे अशी तुझी अवस्था होईल तेव्हा त्या विटेवरी मी सहजस्थितीत उभा ( ठेला ) आहे . ही सहजस्थिती संतांना प्राप्त झालेली असते.

            ‌ ‌ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ।।४८।। ‌ 

अर्थ-ः ते संत दांभिक वैराग्याने भोगाला विटत नाहीत, आणि क्षणिक वैतागाने त्याग करण्यास उठत नाहीत तर, ते स्वतः आपल्या सहजस्थितीत सर्वकाळ राहतात. ||४८||

एकनाथी भागवत -