मोगरा फुलला , मनमोगरा फुलला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी
मनाचिये गुंती गुंफियला शेला
बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
अध्यात्मामधे घाई करुन चालत नाही. तिथे फक्त लागतो मनाचा निर्मळ पणा आणि स्वत:चा स्वत:शी असलेला प्रामाणिकपणा.
अगदी मनापासून अभ्यास करण्याजोग्या गोष्टी आहेत. दिशा दाखवणारं कोणी हवं. पुढचा प्रवास प्रत्येकाला आपापल्या अनुभवा नुसार करायचा असतो. सर्वजण एकाच ठिकाणी पोहोचतात . कोणी आधी कोणी उशीरा. कोणाला काही दाखवायचं नाही आहे. आपलीच परिक्षा , आपलीच प्रश्नपत्रिका , उत्तरं ही आपलीच आणि परिक्षक ही आपणच. इथे मार्कांची चढाओढ नाही. किंबहूना आंतरिक वृत्तींमधला उचित बदल आणि समाधान हेच लक्ष्य.
श्रीकृष्ण मला फार आवडतो. जन्मच कोठडीतला पण त्यातून ही मुक्त झाला. आयुष्यातल्या त्या त्या पर्वामधे जे भोग भोगायचे , उपभोगायचे ते सर्व श्रीकृष्णानी केले. रणांगणातून पळाला रणछोडदास नांव ही मिरवलं . प्रेयसी रुक्मिणीला पळवून नेले अन् विवाह रचिला. स्वत:च्या दोन स्त्रिया असून ही जरासंधाच्या विधवांना वरले आणि स्वीकारुन सामाजिक प्रतिष्ठा दिली.
युध्द टाळण्याचा प्रयत्न म्हणून प्रसंगी कर्णासंबंधी गुह्य देखिल उघड केले. युध्द सुरु झाल्यावर अवघड प्रसंगी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही हे दिलेले वचन ही मोडीत काढले . स्वत: राजा असूनही अर्जूनासाठी सारथी झाला. कोणती भूमिका सार्थ नाही केली ? सर्वकाही केले , पणाला लावले .
श्रीकृष्णाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे गलितगात्र अर्जूनाला कर्म करण्यास प्रवृत्त होण्यासाठी उपनिषदांचे सार सांगीतले. गीतेमध्ये भगवंतांनी पार्थ असा शब्द वापरला आहे . पार्थ म्हणजे पृथ्वीचा पुत्र/पुत्री. या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक व्यक्तिसाठी मार्गदर्शक तत्वे सांगीतली.
अर्जूनाला विश्वरुप दर्शन देताना तो छातीठोकपणे सांगतो या सृष्टीचा निर्माता , चालक आणि ध्वंस कर्ता मीच आहे. सर्व माझ्यातूनच उत्पन्न होतात आणि माझ्यातच विलीन होतात. तो म्हणतो माझी सृष्टी दृष्य आणि अदृष्य म्हणजे अस्तित्वात असून डोळ्यांना न दिसणारी ही आठ प्रकारांनी विभागलेली आहे. पंचमहाभूते ही दृष्य तर मन , बुध्दि आणि अहंकार ही डोळ्यांना न दिसणारी म्हणून अदृष्य संबोधिलेली.
यांचा क्रम सांगताना ही उचित स्वरुपांत सांगीतला आहे. आपण क्रम पाहिला तर लक्षांत येईल प्रत्येक तत्व हे चढत्या क्रमानी व्याप्ती वाढवत जाते. पहिलं तत्व पृथ्वी , शब्दश: न घेता पृथ्वी म्हणजे सर्व जड पदार्थ जे सर्वात कमी जागा व्यापतात. त्यानंतर आप म्हणजे केवळ पाणी न समजता सर्व द्रवपदार्थ हे जडापेक्षा अधिक जागा व्यापतात . त्याला तेज म्हणजे उष्णता मिळाली की वायू तयार होतो हे चवथे तत्व अधिक जागा व्यापते . आकाश हे पुढचे तत्व म्हणजे अतिविरळ स्वरुपात असलेला वायूचा संचार . हे आकाश तत्व सर्वाधिक जागा व्याप्त करते . यानंतर सहावा क्रमांक हा मनाचा लागतो. म्हणून म्हंटलंय
'मन: षष्ठाणी इंद्रियाणी' !!
Sixth sense ...
मन हे तत्त्व आकाशापेक्षा अधिक जागा व्यापते त्याचा परिणाम ही खूप मोठ्या प्रमाणावर होतो. कोणाचं मन दुखवू नये असं म्हंटलं जातं ते याचकरितां कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे.
मना नंतर क्रमांक लागतो तो बुध्दिचा . मन चंद्रावरील डागावर कविकल्पना करते पण बुध्दि त्याचे कारण सांगते. विश्लेषक बुद्धीच्या कार्याची व्याप्ती मनापेक्षाही अधिक असते. सर्वात शेवटचं आठवं तत्व म्हणजे अहंकार .
या अहंकाराला इथे गर्व या अर्थानी न घेता भगवंतापासून मी अलग आहे ही भावना जागृत करणारे तत्व असा घ्यावा. या तत्वाच्या प्रभावाखाली 'मी' येतो अन् माझेच स्वतंत्र विश्व निर्मितो. मी आयुष्यभर आपल्याच विश्वात रहातो.
माऊली जेव्हा मोगरा फुलला चं विश्लेषण करुन सांगतात तो हा भगवंतानी सांगीतलेला ज्ञाना चा चढता वाढता मोगरा अन् त्याचा सुगंध . तो एकदा फुलला की त्याचा ही शेला गुंफून बाप रखुमादेवीवरु विट्ठले अर्पावा.
"तेणे मुक्ति चारी साधीयेल्या"
🙏🙏
अनिरुद्ध कवीश्वर-
