उदरभरण नोहे .....
आपल्याकडे जेवायला बसायची पण एक पध्दत आहे. ताटामधे अन्न वाढायची एक शिस्त आहे. पंगतीमधे सर्वांच्या ताटामधे पूर्ण वाढप झाल्याशिवाय ताटातल्या अन्नाला शिवत नाहीत. संयम ठेवावा लागतो. अन्नाच्या सुगंधानी पाचनासाठी आवश्यक लाळ तयार होणे असते . ते आपसूकच साधल्या जाते.
ताट पूर्ण वाढून झाल्यावर ही सर्वांनी एकमुखाने प्रार्थना पूर्वक खालील श्लोक म्हणायची पध्दत आहे.
" वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
अन्नभक्षण यज्ञकर्म आहे हे जाणून सेवन करायची रीत आहे. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे हे शिजवलेले अन्न या स्वरुपात आपल्यापर्यंत पोहोचवण्या साठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश आहे.
भगवंत गीतेमधून आपल्या अस्तित्वाचे वर्णन करुन सांगताना म्हणतात
" अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।१५.१४।।
प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात मी जठराग्नी च्या स्वरुपात राहून प्राण , अपान , समान , उदान , व्यान या वायुंच्या सहाय्याने सर्व अन्नाचे पाचन करतो.
थोडक्यात आपण जेवतो ते आपल्या देहातील ईश्वराला आहुती म्हणून अर्पण करीत असतो. तो अग्निस्वरुप आहे म्हणून ते यज्ञकर्म .
जे अन्न आपण सेवन करु त्यापासूनच शरीर पुष्ट होते असते. यास्तव आपल्याकडे अन्न शिजवण्यापासून ग्रहण करेपर्यंत शुचिता , स्वच्छता पाळण्याची परंपरा आहे. आपण या यज्ञात जी आहुती देऊ त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे याची जाणिव ठेवली पाहिजे.
आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्र आहे या यज्ञकर्माचे काय फळ मागीतले आहे पहा ...
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥११॥
आपल्याकडे प्रत्येक कार्याला ईश्वराचे अधिष्ठान असावे अशी प्रार्थना केली गेली आहे.
आसनमांडी घालून जेवायला बसण्यामागचा उद्देश ही आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न सेवन करु नये असाच आहे. सावकाश जेवणे म्हणजे पोटात अवकाश , थोडी जागा शिल्लक राहिल एवढंच जेवणे अपेक्षित आहे.
अन्न धान्य पिकवणार्या शेतकर्यांविषयी, स्वयंपाक करणार्या हातांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे सुसंस्कृतपणा चे लक्षण आहे.
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment