जन्म आणि मृत्यू ही फक्त स्थित्यंतरे आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला शारीरिक तसेच मानसिक स्थितीमध्ये ही बदल होत असतात. जीव सतत दु:खात किंवा सतत सुखात ही राहू शकत नाही.
मन जिथे जिथे म्हणून संलग्न होतं तिथे तिथे सर्व भावभावना रुजतात. सुख दु:ख या मनाच्या संकल्पना आहेत. मनाविरुद्ध अथवा न रुचणार्या गोष्टींमुळे दु:ख वाटते. मनासारखं झालं म्हणजे सुखावह क्षण छान वाटतात.
माझ्याच वाट्याला का यावे दु:ख हा प्रश्न फार त्रास देतो.
बुध्दिवंतांसाठी आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत , संदेह मिटला पाहिजे , बरोबर असो की चूक सर्व गोष्टी मला कळायलाच हव्यात हा अट्टाहास मनुष्याला सतत अस्वस्थ करतो. साहजिकच त्याचे मनस्वास्थ्य बिघडते.
नामस्मरणाने तर कोणाला गायनानी , वादनाने , कोणाला नृत्यानी , वाचनानी कधी कोणाला भटकंती केल्यानी , कोणाला समुद्राकाठी - नदीकाठी शांत बसल्यानी चित्त हळूहळू मनाला दिशा देते. आपापल्या कृष्णाच्या रुपाशी मन जडले की इतर व्यवधानं सावकाश का होईना कमी होत जातात अन् त्या अनुषंगाने वैचारिक गोंधळ कमी होतो.
विचारांमध्ये सुस्पष्टता आली की कार्य करण्यात शिस्त येते. संतोषानी मनाची चलबिचल कमी होते.
जीवाचा विसावा त्याला माहित असतो. ज्याच्या त्याच्या कृष्णाची स्पंदने कुठे , कशी जाणवतील हे तो कृष्णच ठरवतो.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment