अमृतानुभव - ऐक्य विचार
मी 'स्व' 'स्थ' होत असताना ऊर्जेच्या तरंगांशी एकरुप होतो अन् त्याच्या आनंदलहरीं वर झुलत असता माझं स्वतंत्र अस्तित्व रहात नाही . माझ्यातला मी स्वान्त सुखाच्या अधीन स्वतःला झोकून देतो. सौंदर्याचा आस्वाद घेत घेत स्वतः च सौंदर्यलहरी होणं ही अनुभूती वर्णनापलिकडे आहे.
ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अत्यंत समर्पक उदाहरणांद्वारे तो अमृतानुभव समजाऊन देतात.
अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे l
आणि साजिरे पणाचा लाभु मिळे l
तरी स्वतरंगांची मुकुळे l
तुरंबु का पाणी ll ५९ ll अमृतानुभव
पाण्यावर तरंग उठत असतात. स्वतः भोवती रिंगण घालतात . ते थुई थुई नाचत , गिरकी घेत असताना पाहाणं एक सुंदर अनुभव असतो.
तरंग संपले की दृष्य नाहिसे होऊन तरंग पाण्यात सामावून जातात. मूळ पाणी जसेच्या तसेच रहाते.
दृष्यमान जरी भिन्न भासले तरी मूळ एकच असल्याची सौंदर्यजाणीव होत असता मुद्दलाला धक्का न लागता सहज आस्वाद घ्यायला काय हरकत आहे. मुळास हानी न पोहोचवता सौंदर्याकडे पहाण्याची अशी नजर खरे ऐक्य साधते.
सौंदर्य कुठे आणि कशाप्रकारे प्रकट होऊ शकते अन् त्याचा अनुभव कसा घ्यावा याची उत्तम शिकवण माऊली सोप्या सोप्या उदाहरणातून स्पष्ट करते.
हे कैवल्याचे चांदणे अविरतपणे माऊलीच्या शब्दा शब्दांतून झिरपत असते.
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment