काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने ...
शिवसूत्रांचा मागोवा
आठव्या शतकातील एक विद्वान आणि शिवोपासक ' वसुगुप्त ' याला स्वप्नांत दृष्टांत झाला. पहाटे तो स्वप्नांच्या अनुषंगाने शोधार्थ निघाला तेव्हा एका खडकावर कोरलेली शिवसूत्रे त्यास पहावयास मिळाली. त्यांनी स्पर्श करताच खडक उलटा झाला. जणू त्यांनी ती वाचून आत्मसात करावीत एवढंच प्रयोजन होतं.
काश्मीर मधील महादेव पर्वत हे ते ठिकाण अन् आज ही तो खडक 'शंकरपाल' म्हणून ओळखला जातो. दल लेक पासून हा प्रदेश जवळ असल्याचे समजते.
वसुगुप्तानी आपला शिष्य भट्टकलटाला ही शिवसूत्रे उलगडून सांगीतली. भट्टकलटाने ती सूत्रबध्द करुन ' स्पंदकारिका ' या ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात आणली. देवनागरी लिपी मधील स्वर - व्यंजनांची उत्पत्ती तसेच त्यांच्या अधिष्ठात्री देवता आणि शक्ति यांचे वर्णन त्यात आढळते. सृष्टीच्या निर्मितीचे गूढ यात सांगीतले आहे. ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा. हा अक्षरविज्ञान त्याचबरोबर व्यवस्थापनाची मूळ सूत्रे यांचा अलौकिक ठेवा आहे.
भट्टकलटानंतर ही परंपरा मुकुल भट्ट , भट्टेन्दुराज, क्षेमराज , योगराज , स्वामी मंकक (१८६०) , स्वामी राम (१८५२-१९१४) , स्वामी लक्ष्मण जू (१९०७-१९९१) पुढे नेली.
स्वामी लक्ष्मण जू यांनी जम्मू-काश्मीरमधे ईश्वर आश्रम स्थापन केला आहे. बरेच विदेशी अभ्यासक इथे येत असतात.
अशी ही ज्ञानोपासकांची , साधकांची परंपरा अव्याहतपणे सुरुच आहे. अगदी आत्ताचे उदाहरण घ्यायचे झाले तर चित्रा व उमेश नगरकट्टे या उच्चविद्याविभूषित दांपत्यानी ( both Ph.d in mathematics ) स्पंदकारिका या शिवसूत्रांवर आधारीत ग्रंथाचा अभ्यासपूर्ण इंग्रजी अनुवाद २०१६ मधे प्रसिद्ध केला आहे. स्वामी मुक्तानंदांचा त्यांना आशीर्वाद होता.
ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभव या ग्रंथामध्ये तिसऱ्या अध्यायात सोळाव्या ओवीमधे स्पष्टपणे शिवसूत्रांचा उल्लेख आहे. आठव्या शतकातील वसुगुप्त आणि बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर माऊली यात सुमारे चारशे वर्षांचे अंतर आहे.
आजच्या काळातील संदेशवहनाचे, दळणवळणाचे कोणते साधन नसताना ज्ञानाची ही परंपरा कशी अखंडीत राहिली असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाथपंथीयांद्वारा गुरु-शिष्य परंपरेतून गुह्यरित्या पिढी दर पिढी पोहोचलं गेलं असावं.
आज पुस्तक रुपाने अनेक विद्वानांनी मूळ संस्कृत भाषेतील स्पंदशास्त्राची संहिता विविध भाषांमध्ये अनुवादित केली आहे.
यवतमाळचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पंदकारिका या ग्रंथातील अक्षरविज्ञानावर तीस वर्षे संशोधन करुन त्यावर आधारित थेरपी सुरू केली आहे. त्यांचा मुलगा स्वप्निल ही आयुर्वेदिक वैद्य असून त्याने ही थेरपी नागपूर येथे पुढे सुरु ठेवली आहे. प्रत्येक अक्षरांच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारणाचा शरीराच्या कोणकोणत्या भागावर कसा परिणाम साधल्या जातो याचं वर्णन करणारा ' आयुर्वेदीय अमृतानुभव ' हा ग्रंथ लिहिला आहे.
काश्मीर हा केवळ एक भूभाग नाही तर सांस्कृतिक आणि ज्ञानमार्गावरील साधकांनी निर्माण केलेल्या परंपरांचा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण भारतभर अनेक प्रांतातील वेगवेगळ्या भाषिक विद्वानांनी त्याचा लाभ घेतला आहे.
वरील माहिती ही प्रचंड सागरातील एका थेंबाएवढीच आहे हे समजलं तरी त्याचं महत्व लक्षात येईल.
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment