परिपक्वता खर्या अर्थाने आली पाहिजे.
कोणाचं आहे माहित नाही पण एक सुंदर वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरल्या गेलंय.
" Any success at the cost of family is really failure "
मनुष्यानी कितीही प्रगति केली , पैसा , किर्ती मनमरातब मिळवला पण जर कुटुंबातील सर्वांकडे दूर्लक्ष करुन प्राप्त केलं असेल तर ती आयुष्यातील मोठी हार असेल.
ज्या करिता आपण लग्न करुन कुटुंब वाढवलं त्यांच्या शारिरीक, मानसिक गरजांकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे.
कुटुंबातील प्रत्येकाच्या समस्या समजून घेणं त्यावर उत्तरं शोधणं , त्रासात धीर देणं तसंच छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करणं , आनंदात सहभागी होणं हा कुटुंबप्रमुखाच्या कर्तव्याचा अविभाज्य भाग आहे.
हे सर्व करत असताना आपली मुलं मोठी झाल्यावर मुलांना त्यांच्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी, त्यांना त्यांच्या मनानी काळानुरुप बदल करण्यासाठी मोकळीक देणं आवश्यक आहे.
छोट्या छोट्या गोष्टीं मधे आपला अट्टाहास सोडायला हवा. कारण आपला अनाठायी अहंकार कुरवाळण्यात आपल्या माणसांना दुखवत तर नाही ना ? असा विचार करायला हवा.
आम्ही नाही का आमच्या आई-वडिलांची , सासू -सासर्यांची सेवा केली मग मुलांनी आमची सेवा करायलाच हवी हा विचार करणे म्हणजे आपण जबरदस्तीने आपला दबाव त्यांच्यावर टाकण्यासारखे आहे.
त्यापेक्षा आपण वयानुसार मनाने अलिप्त राहून मुलांना त्यांच्या गरजेनुसार हवी तेव्हा मदत करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपली ही मानसिक घडण ही परिपक्व होत जाते.
वैयक्तिक उन्नयन होण्यासाठी देखिल स्वतःमध्ये बदल स्वीकारण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment