मुलांची जबाबदारी वाढती असते . आईची जबाबदारी संपत नाही.
आपल्या पिढीतील सर्वांना आधीची पिढी आणि नंतरची पिढी दोघांनाही धरुन ठेवायची सवय आहे. ते एका अर्थाने बरोबर असले तरी वैयक्तिक आयुष्यात आपली मूळ अध्यात्मिक प्रवृत्ती अधून मधून उचल खाते.
मी आणि माझी कुलदेवता, माझे आराध्य दैवत , माझे गुरु यांच्यातील अनुबंध अंतर्मनात जागृत असतो. तसाच काळोखात खोल मनात एक दुखरा कोपरा ठसठसत असतो. आपल्याशीच संवाद साधणारा , मध्यमेतला कातर स्वर . जखमेची ही सवय व्हावी तसा .
आयुष्य म्हणजे वळणा वळणाची वाट . कधी कोणते वळण घेईल याची तिळमात्र कल्पना नसलेला मार्ग. सर्व भार महाराजांवर सोपवून भोगणे अथवा उपभोगणे एवढेच आपल्या हाती.
स्मशान वैराग्य , वैराग्य , ज्ञानोत्तर वैराग्य एकेक अवस्था नकळत येणारी . माऊलींनी भक्तिरसपूर्ण ज्ञान आणि रसिकता यांची सांगड घातली. जिवंतपणे मोक्षाचा अनुभव देणारे अमृतानुभव सांगून अलौकिक जाणिवांचा वर्षाव केला.
नवरसात्मक भावभावनांच्या पलीकडील दीर्घ शांततेतील अविरत उठणार्या आनंद कल्लोळाच्या ऊर्मी शब्दांत गोठवल्या. बस्स!! आता स्वयंभू , स्वसंवेद्य आत्मरुपातील स्फुरण केवळ स्वानंदघन सोहळा.
जय जय रामकृष्ण हरि
जय जय रामकृष्ण हरि
🙏🙏🌹
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment