प्रत्येक वयातल्या समजूतीनुसार मनुष्य वागतो. त्यात बरोबर चुकीचं असं काहीच नाही. वाचन , मनन आणि मैच्युअर लोकांची संगत यामुळे विचारांमधे बदल घडत जातात. मन , विचार अधिक समृध्द होत जातात. देहातीत विचारांनी आत्मनाआत्मविवेक जागृत होतो. तिथे खरं इवॉल्मेंट ला सुरुवात होते. या स्थितीमधे मन कधी देहाशी निगडीत स्वार्थाशी संबंधीत विचार करतं तर कधी देहातीत होऊन आत्ममग्न स्थितीमधे रहातं. दोन्ही अवस्थांमधे मन कधी इकडे कधी तिकडे असं फिरत रहातं . नामस्मरणानी मन रितं होत रहातं. हळुहळु त्याची गोडी लागते . अशा वेळी मनाला ओढ लागते ती शांत , निमग्न अवस्थेची. आता आपल्याला खरे सुख कशांत आहे ते कळू लागते. पण परमेश्वराची लीला तो कधी समजू देत नाही. मन फसवते . सतत वेगवेगळ्या पध्दतीनी असं भासवते की बस्स आता सर्व ज्ञात झाले . आता कैवल्यानंद कारण त्याची छोटीशी झलक नामस्मरणानी मिळालेली असते. काही छोट्या सिध्दी प्राप्त होतात. अशावेळी तावडीत सापडलेल्या उंदराला मांजर जशी खेळवून खेळवून दमवते तशी माया जीवाला इंद्रियगोचर सुखाची लालूच दाखवत खेळवत रहाते. त्यात मन मोठीच भूमिका निभवते. वस्तूस्थितीचं यथास्थित ज्ञान झाल्यावरच सत्याची प्रतिष्ठापना होते. तोपर्यंत त्रिशंकू अवस्थेत जीव अधांतरी असतो.
No comments:
Post a Comment